केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली वृद्ध वकिलाला ९८ हजारांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:05 AM2021-01-04T04:05:32+5:302021-01-04T04:05:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली ६२ वर्षीय वकिलाच्या खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार ताडदेवमध्ये समोर आला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली ६२ वर्षीय वकिलाच्या खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार ताडदेवमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी ताडदेव पोलीस अधिक तपास करत आहेत.
ताडदेव परिसरात राहणारे तक्रारदार उच्च न्यायालयात वकिली करतात. १६ डिसेंबर रोजी घरात असताना, मोबाईल क्रमांकाची २४ तासांत केवायसी न केल्यास कॉल बंद होणार असल्याबाबतचा संदेश मोबाईलवर आला. त्यांनीही विश्वास ठेवून संदेशातील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून याबाबत चौकशी केली. ठगाने लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगितले. त्यानुसार माहिती भरताच, खात्यातून ४५ हजार रुपये कमी झाल्याचा संदेश आला. याबाबत कॉलधारकास विचारताच त्याने दुसऱ्या दिवशी पैसे खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले.
दुसऱ्या दिवशी खात्यात पैसे जमा करण्याच्या नावाखाली खात्यातून आणखीन पैसे गेले. १८ तारखेला बँक खाते तपासले असता, त्यातून ९८ हजार ७०३ रुपये काढण्यात आल्याचे दुसऱ्या दिवशी समजले. यात फसवणूक झाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.