इमारतीच्या २२ व्या मजल्यावरून उडी मारत कांदिवलीत वृद्धाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:28 AM2020-06-18T02:28:05+5:302020-06-18T02:28:15+5:30
पोलीस तपास सुरू; दम्याच्या आजारामुळे आले होते नैराश्य
मुंबई : राहत्या इमारतीच्या बाविसाव्या मजल्यावरुन उडी मारून सत्तर वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी कांदिवलीत घडला. दम्याच्या आजाराला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र सुसाईड नोट न सापडल्याने याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत चौकशी सुरू केल्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितले.
बी. राठोड असे या वृद्धाचे नाव होते. ते कांदिवली पश्चिमेतील एसआरएच्या जय भारत को आॅप. सोसायटीमध्ये बावीसाव्या मजल्यावर पत्नी, मुलगी आणि जावयासोबत वास्तव्यास होते. त्यांना गेल्या दहा वर्षांपासून दम्याचा आजार होता. त्यामुळे ते बेजार झाले होते. बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास कुटुंबीयांची नजर चुकवून घराच्या हॉलमध्ये असलेल्या खिडकीतून त्यांनी अचानक उडी मारली.
याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि राठोड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यांनी एखादी सुसाईड नोट लिहिली आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. राठोड यांना असलेल्या दम्याच्या आजाराने ते निराश झाले होते. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असे कुटुंबीयांचे म्हणणे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवी अडाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.