मुंबई : अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील स्वच्छतागृहात एक ८३ वर्षीय व्यक्ती पाय घसरून पडल्यानंतर त्यांच्या खुब्याला फ्रॅक्चर झाले. मात्र, विमान कंपनीने त्यांना कोणतेही सहकार्य केले नाही, असा आरोप या व्यक्तीच्या मुलीने केला.
जसवंत सिंग असे या व्यक्तीचे नाव आहे. ते दिल्लीहून वॉशिंग्टन डीसी येथे मुलीकडे जात होते. या प्रकारास त्यांची मुलगी मनदीप कौर हिने एअर इंडियाला जबाबदार धरले आहे. “विमानातील स्वच्छतागृहात पाणी सांडले होते. त्यामुळे माझे वडील पाय घसरून पडले”, असा आरोप तिने समाज माध्यमावर केला आहे.
विमान १२ तासांनी वॉशिंग्टन येथे उतरले तेव्हा आपल्या वडिलांना चालता येत नव्हते. त्यांना दवाखान्यात नेले असता खुब्याला फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, असेही मनदीप कौर हिने म्हटले आहे.
एअर इंडियाचे म्हणणे
कंपनी कर्मचाऱ्यांनी मदत केली नसल्याच्या आरोपाचे एअर इंडियाने खंडन केले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विमानात उपलब्ध असलेली वैद्यकीय मदत त्यांना दिली होती. तसेच विमानातून उतरल्यानंतरही त्यांना व्हीलचेअरने बाहेर नेले, असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे.