सातमजली इमारतीच्या गच्चीवरून पडून वृद्धेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:23+5:302021-07-14T04:09:23+5:30
मुंबई : सातमजली इमारतीच्या गच्चीवरून पडून माया जयशंकर सिंह (६१) या महिलेचा मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे हा प्रकार बोरीवलीच्या ...
मुंबई : सातमजली इमारतीच्या गच्चीवरून पडून माया जयशंकर सिंह (६१) या महिलेचा मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे हा प्रकार बोरीवलीच्या संक्रमण शिबिर इमारतीत घडला. त्या मानसिक रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू होते, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्यानुसार, या प्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, अधिक चौकशी सुरू आहे.
सिंह या मुलगा अंकुश (३१) याच्यासोबत संक्रमण शिबिरात गुलमोहर या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहत होत्या. मंगळवारी सकाळी त्या इमारत परिसरात जखमी अवस्थेत स्थानिकांना दिसल्या. त्यानुसार, त्यांनी याबाबत पोलिसांना व अंकुशला कळविले. कस्तुरबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, त्यांना कांदिवलीच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. खासगी कंपनीत अंकुश नोकरी करतो.
महिन्याभरापूर्वी सिंह यांना शिव रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, अचानक घरातून त्या निघून जायच्या आणि परत यायच्या. ‘मंगळवारी पहाटे पावसाचा जोर वाढला होता, त्यामुळे घराबाहेर कोणीच नव्हते. परिणामी, त्या पडल्याचे कोणी पाहिले नाही, तसेच संक्रमण शिबिर असल्याने आसपास सीसीटीव्ही कॅमेरेही नाहीत. मात्र, सिंह यांची वैद्यकीय कागदपत्रे पडताळून पाहण्यात आली असून, अद्याप तरी यात काही संशयित बाब आढळलेली नाही, त्यानुसार, या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे,’ अशी माहिती कस्तुरबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शीतल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.