मुंबई : लॉकडाऊनमुळे रोजगार बुड़ाला. कोरोनाच्या धास्तीने घरातच दिवस मोजत असलेल्या ६५ वर्षीय मुख़्तार अन्सारी या अजोबांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांचा हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलीस अधिक तपास करत आहेत. विक्रोळी कन्नमवार नगर २ येथे अन्सारी हे १९९० पासून एकटेच राहण्यास होते. त्यांची बहिण कुवेतला राहण्यास आहे. अन्सारी हे रिक्षा चालवून स्वतःचा उदरर्निवाह करायचे.
लॉकडाऊनमुळे गेले दोन ते तीन महीने ते घरीच होते. स्वतःच जेवण बनवून घरातच राहयचे. याच दरम्यान बरेच दिवस अन्सारी चाचा दिसले नाही, त्यात त्यांच्या घरातून दुर्गधी वाढल्याने शेजारच्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, दरवाजा तोडला. तेव्हा अन्सारी यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ७ ऑगस्ट रोजी पोलिसांच्या हाती लागला. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह राजावाड़ी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृतदेहाच्या अवस्थेवरून त्यांचा ७ ते ८ दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांच्या मृत्यूमुळे स्थानिकांना धक्का बसला आहे. त्यांच्या भाचाने पोलिसांना दिलेल्या माहितीत अन्सारी यांचे तलाक झाल्यानंतर १९९० पासून ते एकटेच राहयचे. तसेच ते जास्त कुणाला भेटत नव्हते. लॉकडाऊनमध्ये त्यांनी घराबाहेर पड़णेही बंद केले होते. त्यात मानसिकरित्याही ते स्थिर नव्हते अशी माहिती दिली आहे. सध्या तरी संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही. शवविच्छेदनाच्या अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी नमूद केले आहे.