जुने मंत्री अन् जुनाच कारभार, CMO प्रशासन विसरलं 'मंत्रिमंडळ विस्तार'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 03:30 PM2019-06-19T15:30:31+5:302019-06-19T15:30:59+5:30
विधानसभा अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.
मुंबई - डिजीटल पार्टी असलेल्या भाजपा नेत्यांनी अद्यापही प्रशासनाला डिजीटल केलं नसल्याचं दिसून येतंय. कारण, मंत्रिमंडळ विस्तार होऊन 5 दिवस उलटले, तरीही मुख्यमंत्री कार्यालयाच्या वेबसाईटवर जुन्याच मंत्र्यांचे प्रोफाईल दिसत आहे. या वेबसाईटवर अजूनही नवीन मंत्री आणि त्यांचे खाते याबाबतचा तपशील दिसून येत नाही. तर, ज्या मंत्र्यांना मंत्रीपदावरुन डच्चू देण्यात आला आहे, त्यांचेही नाव अद्याप सीएमओच्या वेबसाईटवर झळकत आहे.
विधानसभा अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या विस्तारात 13 नवीन चेहऱ्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामध्ये, शिवसेनेच्या दोन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटातील एका नेत्याला मंत्रीपद देण्यात आले. राजभवनात मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विद्यमान मंत्र्यांकडूनही काही खाते काढून घेण्यात आली आहेत. तर, काही खातेपालटही करण्यात आली आहेत. त्यामध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून शिक्षण खाते काढून घेतले असून नवनियुक्त मंत्री भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे या खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर, प्रकाश मेहता यांना मंत्रीपदातून डच्चू देण्यात आला असून त्यांच्याकडील गृहनिर्माण मंत्रालय नवनिर्वाचित मंत्री जयदत्त क्षिरसागर यांना देण्यात आले आहे.
पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट हे खासदार झाल्याने त्यांच्याकडीली खातेही इतर नवनिर्वाचित मंत्र्यांकडे देण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही सीएमओच्या वेबसाईटवर या मंत्र्यांची नावे त्यांच्या खात्यासहित झळकत आहेत. त्यामुळे डिजीटल पार्टी म्हणजे डिजीटल प्लॅटफॉर्मचा जलद आणि योग्य वापर करणाऱ्या भाजप सरकारने प्रशासनाला मोकळीक दिली की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण, सीएमओची वेबसाईट सांभाळणाऱ्या प्रशासनाला मंत्रिमंडळ विस्ताराचा विसर पडल्याचेच दिसत आहे.