न्यायासाठी चेंबूरमधील वृद्ध चढला विजेच्या टॉवरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 04:33 AM2017-11-24T04:33:25+5:302017-11-24T04:34:34+5:30
मुंबई : मारहाण केलेल्या आरोपींवर पोलीस कारवाई करीत नाहीत म्हणून ६७ वर्षांचा वृद्ध चक्क वीजपुरवठा करणा-या टॉवरवर चढल्याची घटना गुरुवारी घडली.
मुंबई : मारहाण केलेल्या आरोपींवर पोलीस कारवाई करीत नाहीत म्हणून ६७ वर्षांचा वृद्ध चक्क वीजपुरवठा करणा-या टॉवरवर चढल्याची घटना गुरुवारी घडली. त्यांनी उडी मारण्याची धमकी दिल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करीत तासाभराने त्यांना खाली उतरविले.
चेंबूर कॉलनी येथील एम.एस. इमारतीत ६७ वर्षांचे गोपाल मेंडा एकटे राहतात. मेंडा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, १६ मे २०१४ आणि १९ मे २०१४ रोजी त्यांच्याच इमारतीतील दोन रहिवाशांनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणी त्यांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र तक्रार देऊनही पोलीस काहीच कारवाई करीत नसल्याने आत्महत्येसाठी त्यांनी विजेचा टॉवर गाठला.
चेंबूर येथील सुमननगरच्या प्रियादर्शनी सर्कल परिसरातील टाटा पॉवरच्या विजेच्या टॉवरवर ते चढले. याबाबत ४च्या सुमारास अग्निशमन दलाला माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना समजावण्यास सुरुवात केली. न्याय मिळाला नाही, तर उडी मारण्याची धमकी मेंडा देत होते. ते कुणाचेच ऐकत नव्हते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून पाठीमागून टॉवरवर चढत त्यांना सुखरूप खाली उतरविले. याबाबत चुनाभट्टी पोलिसांनी घटनेची नोंद करीत तपास सुरू केला आहे.