मुंबई - मागील जवळपास दीड महिन्यांपासून बॉक्स ऑफिसवर जणू दुष्काळग्रस्त चित्र पाहायला मिळत आहे. 'बडे मियां छोटे मियां'नंतर कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित न झाल्याने हिंदी सिनेसृष्टीसह सिनेमागृहांचे मालक चिंतेत आहेत. यावर तोडगा म्हणून गाजलेले जुने हिंदी-मराठी चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आले आहेत.
अगोदर परीक्षांचा काळ आणि नंतर आयपीएल, कडक उन्हाळा आणि लोकसभा निवडणूकांच्या वातावरणामुळे मागील काही दिवसांमध्ये मोठे हिंदी चित्रपट रिलीज करण्याचे धाडस निर्मात्यांनी केले नाही. या तुलनेत वेगवेगळ्या विषयांवरील मराठी चित्रपटांनी चांगला गल्ला जमवला. महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर'सह परेश मोकशीचा 'नाच गं घुमा' आणि सुनील बर्वेच्या 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र बॉक्स ऑफिसवरील हिंदी चित्रपटांची उणीव भरून निघू शकली नाही. त्यावर तोडगा म्हणून रणवीर सिंग व आलिया भट्टचा 'रॉकी और रॉनी की प्रेमकहानी' आणि रणबीर कपूर व दीपिका पदुकोण यांचा 'तमाशा' हे दोन चित्रपट या आठवड्यात पुर्नप्रदर्शित करण्यात आले आहेत. करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मागच्या वर्षी, तर इम्तियाज अली दिग्दर्शित 'तमाशा' २०१५मध्ये आला होता. या दोन चित्रपटांखेरीज आणखी काही हिंदी व मराठी चित्रपट सिनेमागृहांमध्ये आहेत.
इम्तियाजचे आणखी दोन सिनेमे...इम्तियाजने दिग्दर्शन केलेला रणबीर कपूर व नर्गिस फाखरी यांचा 'रॉकस्टार' आणि करीना कपूर व शाहिद कपूर यांचा 'जब वी मेट' हे दोन चित्रपट अगोदरपासूनच सिनेमागृहांमध्ये आहेत. याखेरीज शाहरुख खान आणि काजोल यांचा 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे' १९९५पासून अविरतपणे सुरू आहे. मागच्या आठवड्यापर्यंत शाहरुख खान व अनुष्का शर्माचा 'रब ने बना दी जोडी' सिनेमागृहांमध्ये होता.
मराठी सिनेमेही मागे नाहीत...स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीचा सतीश राजवाडे दिग्दर्शित 'मुंबई-पुणे-मुंबई' हा मराठी चित्रपटही सिनेमागृहात आहे. स्वप्नील, सई ताम्हणकर, अंकुष चौधरीच्या 'दुनियादारी' आणि रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख यांच्या 'वेड'सुद्धा सुरू आहे. महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकरांचा 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय!' हा संतोष मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटही पुन्हा मनोरंजन करत आहे.