शाईतून रेखाटली जुनी मुंबई! कलाकार अमन यांचे जहांगीर कला दालनात प्रदर्शन
By स्नेहा मोरे | Published: February 7, 2024 07:57 PM2024-02-07T19:57:12+5:302024-02-07T19:57:34+5:30
१२ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत कलारसिकांसाठी खुले राहिल.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - मागील काही वर्षांत मुंबई बदलत गेली आहे. या बदलत गेलेल्या शहराच्या स्थित्यंतराचे प्रत्येकालाच आकर्षण असते. त्यामुळे याच भावनेतून चित्रकार अमन यांनी पेन- शाईच्या माध्यमातून जुन्या मुंबईचे कॅनव्हासवर चित्रण केले आहे. कुलाबा येथील जहांगीर कला दालनात आयोजित विशेष प्रदर्शनात जुन्या काळातील मुंबईची सफर कलारसिकांनी आवर्जून करायला हवी. १२ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत कलारसिकांसाठी खुले राहिल.
चित्रकार अमन हे एक मुरब्बी आणि आपल्या प्रतिमेला बोलके करणारे चित्रकार, खूप बारकाईने कलेशी एकरूप होतात. गेली २५ ते ३० वर्षे कलाक्षेत्रात रंगांची उधळण आणि रसिकांशी चित्राद्वारे हितगुज करत आहेत. या प्रदर्शनातील चित्रे अत्यंत बोलकी आहेत, त्यातील मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ टिपतानाच समुद्रातील त्या छोट्या छोट्या लाटा किनाऱ्यावर कशा शांतपणे विसावतात या मेळ साधणारे चित्र डोळे दिपवणारे आहे.
प्रदर्शनातील चित्रांतून मुंबईची ओळख करून घेताना आपण त्या वास्तू परिसरातच आहोत, याचा भास होतो, हे कलाकृतींचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी रेखाटलेल्या मुंबईवरील तीन चित्रांनी राज्य शासनाच्या 'बॉम्बे सिटी ऑफ आयलंड २०११' या गॅझेटच्या तीन खंडांवर कव्हर म्हणून स्थान पटकावले आहे. आपले फाईन आर्टचे शिक्षण रंगून येथे पूर्ण केल्यानंतर १९९४ पासून या क्षेत्रात सक्रिय आहेत. सध्याच्या मोबाईलच्या आणि चटकन प्रतिमा खेचण्याच्या युगातही कॅनव्हासवरील चित्राचे आकर्षण काय असते, हे या चित्रांत जाणवते. मुंबईने गेल्या अनेक दशकांत वेगवेगळ्या स्थित्यंतरातून वाटचाल केली आहे, अशा त्या इतिहासाला कलेच्या कॅनव्हासवर आपल्या कौशल्याने रेखाटणाऱ्या कलाकारांपैकी अमन आहेत, हे प्रदर्शनातून दिसून येते.