जुन्या मुंबईची परंपरा जपतेय ‘प्रभादेवीची जत्रा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 01:52 AM2020-01-10T01:52:50+5:302020-01-10T01:52:55+5:30
पौष महिन्यात येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध देवस्थानांच्या जत्रा भरतात.
राज चिंचणकर
मुंबई : पौष महिन्यात येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध देवस्थानांच्या जत्रा भरतात. मुंबापुरीतही एकेकाळी काही देवस्थानांचे असे जत्रोत्सव साजरे केले जात असत. पण तत्कालीन मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा काळाच्या ओघात हळूहळू अस्तंगत होत चाललेल्या दिसून येतात. सांस्कृतिक परंपरा जपणाºया मुंबापुरीतल्या अनेक जत्रोत्सवांवर कायमचा पडदा पडला असला, तरी त्यातून प्रभादेवीची जत्रा मात्र आजही तिचे अस्तित्व टिकवून आहे. पौष पौर्णिमा, अर्थात शाकंभरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रभादेवीच्या या जत्रेला प्रारंभ होतो आणि पुढचे १० दिवस प्रभादेवीचा परिसर उत्साहाने दुमदुमून जातो.
ज्या देवीच्या नावावरून प्रभादेवी परिसराला ‘प्रभादेवी’ हे नाव पडले, त्या ‘प्रभावती’देवीच्या उत्सवाने जत्रोत्सवाच्या काळात इथे रंग भरतो. प्रभादेवीच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरापासून हाकेच्या अंतरावर न्यू प्रभादेवी मार्ग आहे. याच मार्गावर प्रभावती देवीचे हे पुरातन मंदिर आहे. मंदिरात प्रभावती देवीसह चंडिका व कालिकादेवीचेही स्थान असल्याने, या तिन्ही शक्तींचे एकत्रित दर्शन घेण्याची पर्वणी इथे भाविकांना लाभते. तसेच मंदिराच्या आवारात खोकलादेवी, हनुमान, शिवशंकर आदी देवताही विराजमान आहेत. या मंदिरात स्थानापन्न असलेली प्रभावती देवी ही समाजातील अनेक ज्ञातींची कुलदेवता आहे आणि त्यामुळे भाविकांची येथे दाटी होते.
जत्रोत्सवाच्या काळात प्रभादेवीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. या जत्रेची खासियत असलेला खाजा, पेठा, हलवा, चिक्की आदी जिन्नसांच्या दुकानांवर भाविकांची मोठी गर्दी उसळते. तर लहान मुलांसाठी मोठमोठे आकाशपाळणे हे या जत्रोत्सवातले आकर्षण असते.
प्रभादेवीच्या जत्रेतली ही दुकाने दुपारनंतर उघडतात आणि मग रात्रीपर्यंत हा परिसर उत्साहात न्हाऊन निघतो. या जत्रेच्या निमित्ताने मुंबईच्या रूढी व परंपरेचे दर्शन समस्त मुंबईकरांना नव्याने होत असते.
प्रभादेवी परिसरातल्या चाळींचे रूपांतर टॉवर्समध्ये होऊ लागले असले, तरी प्रभादेवीच्या जत्रेत मात्र खंड पडलेला नाही. यंदा १० जानेवारी रोजी येत असलेल्या शाकंभरी पौर्णिमेला प्रभादेवीचा जत्रोत्सव सुरू होत आहे. या काळात प्रभादेवीचे मंदिर देवीच्या दर्शनासाठी सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत उघडे राहणार आहे. १९ जानेवारीपर्यंत प्रभादेवीचा हा जत्रोत्सव चालणार आहे.
>इतिहास व शिलालेख...
१२व्या शतकात, त्यावेळच्या मुंबई बेटावर राज्य करणाºया राजा बिंब याची प्रभावती देवी ही कुलस्वामिनी. त्या काळात मुंबापुरीवर परकीय आक्रमणे होत असत. त्यामुळे या देवीची मूर्ती प्रथम माहीमची खाडी व नंतर प्रभादेवी परिसरातील विहिरीत लपवण्यात आली होती. सन १७१४मध्ये पाठारे प्रभू ज्ञातीतील श्याम नायक यांनी ही मूर्ती विहिरीतून बाहेर काढून मंदिर उभारले. कालांतराने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या इतिहासाची नोंद मंदिरात असलेल्या शिलालेखावर आजही दिसून येते.