जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचा-यांचा यवतमाळ ते ठाणे सायकलवरून प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 01:04 PM2018-09-28T13:04:52+5:302018-09-28T13:05:00+5:30
नव्या पेन्शन योजनेला विरोध करत राज्य शासनातील कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आता रस्त्यावर उतरले आहेत.
मुंबईः नव्या पेन्शन योजनेला विरोध करत राज्य शासनातील कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आता रस्त्यावर उतरले आहेत. ‘रन फॉर पेन्शन’ची हाक देत या आंदोलनाने आता वणव्याचे रूप धारण केले आहे. कर्मचारी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनात सामील होत असताना प्रवीण बहादे या कर्मचाऱ्याने थेट यवतमाळ ते ठाणे हे तब्बल 700 किमीचे अंतर सायकलवरून पार करण्यास सुरुवात केली आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेत लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या प्रवीणला हिशेबावेळी या योजनेतील फसवेपणा दिसला. योजनेला विरोध करताना त्याने योजना सोडत असल्याचा राजीनामाही दिला. जुन्या पेन्शनसाठी संघटना निर्माण झाली असून, या संघटनेने मोर्चाची हाक दिल्याचे कळताच तोही या आंदोलनात सामील होण्यासाठी निघाला आहे. वरिष्ठांच्या कारवाईला न घाबरता प्रवीणने 18 सप्टेंबर 2018 रोजी यवतमाळहून जुन्या पेन्शन लढ्याची मशाल घाती घेतली आहे. यवतमाळहून दारव्हा, कारंजा, मालेगाव, मेहकर, सिंदखेड राजा, जालना, औरंगाबाद, कोपरगाव, सिन्नर, इगतपुरी, शहापूर असा प्रवास करत तो 1 ऑक्टोबर 2018 रोजी ठाणे येथून निघणाऱ्या पेन्शन दिंडीमध्ये सामील होणार आहे.
प्रवीणच्या या मशालीमुळे राज्यभरात वणवा पेटला आहे. आतापर्यंत ५० हजारांहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी पेन्शन दिंडीत सामील होण्याचा निर्धार संघटनेकडे व्यक्त केला आहे. त्यामुळे लवकरच मुंबईवर लाखो शासकीय कर्मचारी पेन्शन दिंडी घेऊन धडकतील. तेव्हा या ‘वन मॅन आर्मी’च्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावीच लागेल. जुनी पेन्शन लागू होत नाही, तोपर्यंत हा वणवा शमणार नसल्याचे प्रवीणने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.