Join us

जुन्यांना शेरे, नव्यांना तारे...

By admin | Published: September 12, 2014 1:15 AM

दरवर्षी नगरसेवकांची धाकधुक वाढविणाऱ्या प्रजा फाउंडेशन या संस्थेच्या अहवालाने यंदा धक्काच दिला आहे़

मुंबई : दरवर्षी नगरसेवकांची धाकधुक वाढविणाऱ्या प्रजा फाउंडेशन या संस्थेच्या अहवालाने यंदा धक्काच दिला आहे़ सभागृहात आवाज उठविणाऱ्या व चर्चेत सहभागी होणाऱ्या जुन्या-जाणत्या नगरसेवकांना लाल शेरे मारण्यात आले आहेत़ तर नव्यांच्या प्रगतिपुस्तकात तारे चमकले आहेत़ विशेष म्हणजे गतवर्षी ४४ व्या क्रमांकावर असलेल्या नवनिर्वाचित महापौर स्नेहल आंबेकर यांना पहिला क्रमांक देऊन या संस्थेने सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे़मुंबईतील २२७ वॉर्डांचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक वर्षभर काय काम करतात? याचा अहवाल दरवर्षी प्रजा फाउंडेशनमार्फत प्रसिद्ध करण्यात येतो़ सन २०१३-२०१४ या आर्थिक वर्षातील नगरसेवकांच्या कामगिरीचे मूल्यमापन केलेला अहवाल आज जाहीर करण्यात आला़ यासाठी २२७ वॉर्डांमधील २२ हजार ५८० लोकांचे मत प्रातिनिधिक स्वरूपात घेण्यात आले होते़त्यानुसार विद्यमान महापौर आंबेकर यांनी पहिला क्रमांक पटकावला असून दुसऱ्या क्रमांकावर गतवर्षीच्या टॉपर शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर आहेत़ तर तिसरा क्रमांक भाजपाच्या ज्ञानमूर्ती शर्मा यांना देण्यात आला आहे़ पहिल्या दहा नगरसेवकांमध्ये निम्म्या महिला आहेत़ मात्र एकाही नगरसेवकाला ए ग्रेड मिळालेला नाही, असे पत्रकार परिषदेतून प्रजाने जाहीर केले़ (प्रतिनिधी)