Join us

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ: जुन्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत नव्या समस्यांचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 10:31 AM

मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या समस्या सुटलेल्या नाहीत, तर काही नव्या समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे.

मुंबई : मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या समस्या सुटलेल्या नाहीत, तर काही नव्या समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. भरवस्तीतील डम्पिंग ग्राउंड, आरोग्याच्या समस्या, विक्रोळी पार्क साइट डोंगर भागात कोसळणाऱ्या दरडी, सीआरझेडमुळे रखडलेला पुनर्विकास तर पायाभूत सुविधांवर पडणारा ताण, मिठागरांच्या जमिनीवर भविष्यात बांधकामांचा धोका असल्याच्या तक्रारी आहेत.

मुलुंड, भांडूप पूर्व, विक्रोळी, घाटकोपर पंतनगरमधील मध्यमवर्गीय वस्त्या, घाटकोपर रमाबाई आंबेडकरनगर, भांडूप आणि विक्रोळी पश्चिम पार्क साइट येथील डोंगरावरील  वस्त्या,  मानखुर्द-शिवाजीनगर हा मोठ्या प्रमाणावरील झोपडपट्ट्यांचा भाग असे या मतदारसंघाचे स्वरूप आहे. पुनर्विकास, डम्पिंग ग्राउंड, रुग्णालय हे तीन मुद्दे अलीकडच्या काळात गाजत आहेत. कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंड बंद करावे यासाठी स्थानिक संघर्ष समिती न्यायालयीन लढा देत आहे. सत्तेवर आल्यास डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले असले तरी डम्पिंग ग्राउंडच्या कराराची मुदत २०३२ पर्यंत असल्याने डम्पिंग ग्राउंड बंद होईल का याविषयी स्थानिकांमध्ये साशंकता  आहे.

ना ठोस उपाययोजना, ना लोकांचे पुनर्वसन-

१) विक्रोळी कन्नमवार नगरातील बंद पडलेल्या पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयामुळे  असंतोष आहे. याठिकाणी पालिका २२ मजल्यांचे सुसज्ज रुग्णालय बांधणार आहे. पण त्यासाठी पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था काय, असा  लोकांचा सवाल आहे. 

२) विक्रोळी पार्क साइट सूर्यनगर या डोंगराळ भागावरील वस्त्यांजवळ पावसात दरडी कोसळतात. परंतु तिथे अजून ना ठोस उपाययोजना झाली, ना लोकांचे पुनर्वसन झाले. भांडूप पश्चिमेकडील डोंगराळ भागाचाही विकास झालेला नाही.

आरोग्यसेवेची वानवा-

उत्तर-पूर्व पट्ट्यात खाड्यांच्या  ठिकाणी वस्त्या आहेत. मात्र, सीआरझेडमुळे त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. सीआरझेड नसलेल्या भागात पुनर्विकासाचे उदंड पीक आले असून, आत्ताच पायाभूत सुविधांवर ताण पडू  लागला आहे. जैविक कचरा मोठ्या प्रमाणावर जाळला  जात असल्याने मानखुर्द शिवाजीनगर भागात आरोग्याच्या समस्या आहेत. आरोग्यसेवेची वानवा आहे. मोठ्या प्रमाणावर  झोपड्यांचा प्रश्न आहे.

मुलुंडकरांमध्ये अस्वस्थता-

धारावीतील पाच हजार प्रकल्पबाधितांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन केले जाणार असल्याने मुलुंडकरांमध्ये अस्वस्थता आहे. काही भागात रखडलेला पुनर्विकासाचे प्रकल्प हाही  कळीचा मुद्दा बनला आहे. अंतर्गत भागातील वाहतूक कोंडीमुळे स्थानिक  लोक जेरीस आले आहेत. पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुलुंडमध्ये  प्रवेश करताना मोठी रखडपट्टी होते.

‘ते’ स्मारक रखडले-

चिरागनगर येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक बांधण्याचा प्रस्ताव १० वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. तेथे पुरेशी जागा नसल्याने मंडाळा येथे स्मारक प्रस्तावित आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात असल्याने स्मारक रखडले आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकालोकसभा निवडणूक २०२४ईशान्य भारत