पुरातन प्रार्थनास्थळांनाही फटका
By admin | Published: April 10, 2015 04:31 AM2015-04-10T04:31:44+5:302015-04-10T04:31:44+5:30
वांद्रे येथील पाली हिल परिसरातल्या सेंट अॅन्स चर्चच्या आवारातूनच रस्ता प्रस्तावित केल्याचा आराखड्यातील घोळ ताजा असतानाच बोरीवलीतील पुरातन
मुंबई : वांद्रे येथील पाली हिल परिसरातल्या सेंट अॅन्स चर्चच्या आवारातूनच रस्ता प्रस्तावित केल्याचा आराखड्यातील घोळ ताजा असतानाच बोरीवलीतील पुरातन चर्चही विकास आराखड्याच्या विळख्यात आले आहे़ या चर्चच्या परिसरातूनच दोन रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित असल्याने चर्चच्या भूखंडाचा मोठा भाग, स्मशानभूमी आणि मैदान आणि पुरातन क्रॉसला फटका बसण्याची शक्यता आहे़ यामुळे येथील रहिवासीही पालिकेकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत़
१५ व्या शतकात बोरीवली येथील माउंट पोयसर येथे अवर लेडी आॅफ इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च उभे राहिले़ मात्र आराखड्यातील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाबाबत या चर्चचे विश्वस्त फादर बॅरेटो यांनी जाहीर केल्यानंतर ग्रामस्थांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे़ वांद्रे येथील सेंट अॅन्स चर्चने आराखड्याविरोधात दोन हजार सूचना व हरकती पालिकेकडे दाखल केल्या आहेत़ त्याच धर्तीवर येथील ग्रामस्थही सूचना व हरकती दाखल करणार आहेत़ आराखड्यात प्रस्तावित ६० फुटांच्या रस्ता रुंदीकरणामुळे चर्चचे बांधकाम आणि स्मशानभूमीच्या अर्ध्या भागाचे नुकसान होणार आहे़ अनेक स्थानिकांचे नातलग या स्मशानभूमीत विसावत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे़ चर्चची समिती आराखड्याचा अभ्यास करीत आहेत़ (प्रतिनिधी)