नीट-युजीसाठी जुनेच टाय ब्रेकिंग नियम
By रेश्मा शिवडेकर | Published: March 13, 2024 07:58 PM2024-03-13T19:58:32+5:302024-03-13T19:59:34+5:30
दोन किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांना सारखेच गुण मिळाल्यास प्रवेशाकरिता गुणवत्ता यादी तयार करताना टाय ब्रेकिंग नियमांचा वापर केला जातो.
मुंबई: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेतल्या जाणाऱ्या नीट-यूजी या सामाईक प्रवेश परीक्षेच्या टाय ब्रेकिंग नियमात पुन्हा बदल करण्यात आला आहे. आता हे नियम जुन्या म्हणजे २०२३च्या प्रवेश नियमाप्रमाणेच असतील, असे ही परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टींग एजन्सीने (एनटीए) बुधवारी नवे माहितीपत्रक जारी करत स्पष्ट केले.
दोन किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांना सारखेच गुण मिळाल्यास प्रवेशाकरिता गुणवत्ता यादी तयार करताना टाय ब्रेकिंग नियमांचा वापर केला जातो. नीट-युजीकरिता सारखे गुण असणाऱया विद्यार्थ्यांमध्ये, ज्याला जीवशास्त्रात अधिक गुण आहे, त्याचे नाव गुणवत्ता यादीत वरच्या स्थानावर जाते. तरिही सारखेच गुण येत असल्यास रसायनशास्त्रातील गुणांचा विचार केला जातो. त्यानंतर भौतिकशास्त्र.
तरिही गुण सारखे असतील तर चूक-अचूक उत्तरांचे एकूण प्रमाण पाहून त्यानुसार गुणवत्ता यादीतील स्थान निश्चित केले जाते. तरिही सारखे गुण आल्यास अन्य विषयानुसार चूक-अचूक उत्तरांच्या पर्यायांचा विचार केला जातो. असे सात पर्याय २०२३पर्यंतच्या नीट-युजीकरिता वापरण्यात येत होते.
यंदा यात बदल करण्यात आला. पहिल्या तीन पर्यायांनंतर थेट संगणकाच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ठरविली जाणार होती. परंतु, या बदलावर विद्यार्थी-पालकांनी आक्षेप नोंदवल्याने पुन्हा जुनेच सात टाय ब्रेकिंगचे नियम लागू करण्यात आले आहेत. या बदलाचे विद्यार्थी-पालकांकडून स्वागत होत आहे.