Join us

वनक्षेत्र सुधारण्यासह जुन्या वृक्षांचे होणार संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:06 AM

मुंबई : वनक्षेत्र सुधारण्यासह जुन्या वृक्षांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत मुंबई आता ‘सिटीज ४ फॉरेस्ट’ या आंतरराष्ट्रीय युतीमध्ये सामील ...

मुंबई : वनक्षेत्र सुधारण्यासह जुन्या वृक्षांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत मुंबई आता ‘सिटीज ४ फॉरेस्ट’ या आंतरराष्ट्रीय युतीमध्ये सामील झाली आहे. सिटीज ४ फॉरेस्ट्समध्ये जगातील ६० पेक्षा जास्त शहरांची युती आहे. यात महापौरांची कार्यालये, सार्वजनिक पाणी उपयुक्तता, पर्यावरण आणि वातावरण बदलांची कार्यालय यासारख्या इतर शहर एजन्सींचा समावेश आहे. सिटीज ४ फॉर्सेट्स पीअर-टू-पीअर शिक्षणास प्रोत्साहित करीत असून, शहरे, वने, वातावरण संकट, पाणी, संप्रेषण, वित्त, धोरण, सामाजिक समतेमध्ये तज्ञ असलेल्या संस्थांच्या तांत्रिक सहकार्याने शहरांना जोडले आहे.

२०१९ मध्ये दर सहा सेकंदांत अंदाजे एक फुटबॉल मैदानाच्या आकाराचे जंगल नष्ट झाले. जंगलतोड आणि खराब वन व्यवस्थापन स्थानिक समुदायांना वाढीव धूप, दरडी कोसळणे, पूर व इतर कारणांनी उद्ध्वस्त करू शकतात. जंगलतोड हे संपूर्ण जागतिक कार्बन उत्सर्जनाच्या ११ टक्के आहे. जे जागतिक परिवहन क्षेत्रामुळे झालेल्या कार्बन उत्सर्जनापेक्षा जास्त आहे. जंगलतोड थांबविली तर वातावरणीय बदल थांबविण्याचा मोहिमेत याचा २४ - ३० टक्के वाटा ठरेल. जंगले वाचविण्यासाठी शहरांनी त्यांची वापरलेली नाही अशी क्षमता वापरली पाहिजे. अनेक शहरे त्यांच्या सीमेवरील उद्याने आणि शहरी जंगलांसह स्थानिक जंगलांची देखभाल किंवा संरक्षण करतात. त्यामुळे जंगलांना हवामान संकट व जैवविविधतेच्या नुकसानीपासून वाचविण्याची शहरांकडे प्रचंड क्षमता असून, त्यांनी ती वापरली पाहिजे, असा सूर पर्यावरण क्षेत्रातून उमटत आहे.

आरे जंगल व राज्यातील कांदळवन यांना शासनाने आरक्षित वन जाहीर करून मुंबईनेदेखील वन संरक्षणासाठी हेतू दर्शविला आहे. सोबतच शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत मुंबईने दोन लाखांहून अधिक झाडे लावून या अभियानात विजेता म्हणून मान मिळविला आहे.

सिटीज ४ फॉरेस्ट्स काय करतात?

- राजकीय कृती आणि गुंतवणुकीस प्रेरणा देतात.

- महापौर, अधिकारी, रहिवासी यांना पर्यावरण, वृक्ष संरक्षण व संवर्धणासाठी सक्षम करतात.

- सी ४० उपक्रमांतर्गत मुंबईसाठी वातावरण कृती आराखडा येत आहे.

- सिटीज ४ फॉर्सेट्स हे मुंबई महापालिकेला वृक्षारोपण करण्यात मदत करून वातावरणीय बदल नियंत्रित करण्यास मदत करणार आहे.