Join us

झोपडीतूनच वृद्धा चालवत होती ड्रग्ज रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:05 AM

सव्वा कोटीचे चरस जप्त, साथीदारालाही बेडयासव्वा कोटीचा चरस जप्त, साथीदारालाही अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेजारच्या व्यक्तीला ...

सव्वा कोटीचे चरस जप्त, साथीदारालाही बेडया

सव्वा कोटीचा चरस जप्त, साथीदारालाही अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेजारच्या व्यक्तीला मदतीला घेत ७५ वर्षांची वृद्धा झोपडीतूनच चरस विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघड झाली आहे. जोहराबीन अकबर अली शेख असे त्या वृद्धेचे नाव असून, तिच्या झोपडीतून सव्वा कोटी किमतीचे एकूण तीन किलो ९६० ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने ही कारवाई केली आहे.

गुन्हे शाखा कक्ष ७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना वांद्रे पश्चिमेकडील चिंचवडी भागात एकजण चरस विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. शनिवारी (दि. २२) तो चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून किशोर गवळी (५७) अटक केली. त्याच्याकडे चरसचे सात गोळे सापडले. अधिक चौकशीत चिंचवाडी भागात शेजारी राहणाऱ्या वृद्धेकडून तो हा माल विक्रीसाठी घेत असल्याचे सांगितले. त्यानुसार, पथकाने शनिवारी रात्री शेख वृद्धेच्या झोपडीत छापा टाकला. तेथे पथकाला तीन किलो ८०० ग्रॅम चरस आढळला. या गुन्ह्यात रविवारी वृद्धेला अटक करण्यात आली आहे.

वृद्धा एकटीच येथे राहत असून येथूनच गेल्या अनेक वर्षांपासून ड्रग्ज तस्करी करीत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आतापर्यंत ती कुणाच्या हाती लागली नाही. तसेच वृद्ध असल्याने तिच्यावर कुणाचा संशयही आला नाही. रविवारी वृद्धा शेख आणि गवळीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना २७ मेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.