म्हारळ : आंबिवली येथील शौचालयाच्या टाकीत पडून सुंदराबाई बाळाराम आंबारे (७०) यांचा शुक्रवारी सकाळी ८.१५ च्यादरम्यान शौचास जाताना झाकण नसलेल्या टाकीत पडून मृत्यू झाला़ शौचास जाऊन बराच वेळ झाल्यानंतरही त्या परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध केली असता शौचालयात सुंदराबाईची चप्पल निदर्शनात आली़ टाकीला झाकण नसल्याने ती आतच पडल्याचा संशय घरच्यांना आला. त्वरित पोलिसांना व अग्निशामक दलास कळवण्यात आले. परंतुे चार तास होऊन कोणीही घटनास्थळी फिरकले नसल्याने आंबिवली येथील ग्रामस्थ संतप्त झाले. स्थानिक नगरसेविका लीलाबाई तरे आणि नगरसेवक दशरथ तरे यांनीही पालिका अधिकार्यांना धारेवर धरले. वर्षाहून अधिक कालावधीपासून शौचालयाचे तुटलेले झाकण बदलले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, चार तासांनी उशिरा पोहोचलेले कडोंमपाचे कार्यकारी अभियंता रवींद्र जौरस आणि अ प्रभाग अधिकारी चंदुलाल पारचे यांना ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागले. प्रभाग क्षेत्र अधिकारी पारचे यांनी तर हे काम खासगी असल्याचे सांगताच ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी त्वरित त्यांना निघून जाण्यास सांगितले. जर खासगी काम आहे तर तुम्ही कशाला आलात, निघून जा म्हणून त्यांना ढकलून देण्यात आले़ नंतर, त्यांनी माफी मागितल्यानंतर ग्रामस्थांचा रोष निवळला. दरम्यान, पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला. निर्मलअंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या देखभालीचे काम प्रभाग क्षेत्र अधिकार्यांचे आहे, असे जौरस म्हणताच प्रभाग क्षेत्र अधिकारी पारचे यांनी हे आमचे काम नसून शौचालयाची दुरुस्तीसुद्धा ज्यांच्या अंतर्गत हे शौचालय बांधण्यात आले, त्यांनीच करायची असते. असे म्हणताच दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. दोघांमध्ये समन्वय नसल्याने नाहक एका महिलेचा बळी गेल्याने ठेकेदार, पालिका प्रशासन अधिकारी आणि अ प्रभाग अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी दिला आहे.
शौचालयाच्या टाकीत पडून वृद्धेचा मृत्यू
By admin | Published: May 24, 2014 1:22 AM