जुन्यांच्या नव्या आयडिया

By admin | Published: September 25, 2016 02:01 AM2016-09-25T02:01:20+5:302016-09-25T02:01:20+5:30

अमेझॉन विकणार सेकंडहँड स्मार्टफोन्स : बाजारात दाखल होणाऱ्या नवीन नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वस्तूंपासून ते कपडे, बूट अगदी दागिनेदेखील आॅनलाइन विकत घेण्याची

Older New Idea | जुन्यांच्या नव्या आयडिया

जुन्यांच्या नव्या आयडिया

Next

- प्रसाद ताम्हनकर

अमेझॉन विकणार सेकंडहँड स्मार्टफोन्स : बाजारात दाखल होणाऱ्या नवीन नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वस्तूंपासून ते कपडे, बूट अगदी दागिनेदेखील आॅनलाइन विकत घेण्याची सध्या जगभरच क्रेझ आहे. एका बाजूला या नवनव्या वस्तू विकणारी वेबपोर्टल्स प्रचंड कमाई करत असतानाच, दुसऱ्या बाजूलाच सेकंडहँंड वस्तूंची वेबपोर्टलदेखील ग्राहकांची आणि जोडीला या वस्तू विकणाऱ्यांची प्रचंड गर्दी जमवताना दिसत आहेत. याचाच फायदा घेण्याच्या दृष्टीनं आता चक्क अमेझॉनसारखे मातब्बर शॉपिंग पोर्टल सेकंडहँड फोन्सच्या विक्रीत उतरत आहे. अमेझॉनवर जुन्या स्मार्टफोन्सच्या जोडीलाच दुरुस्त केलेले आणि ‘रिफर्बिश्ड’ स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, लॅपटॉपदेखील विकले जाणार आहेत. एखाद्या उपकरणात काही बिघाड अथवा दोष आढळला, तर असे उत्पादन ग्राहकाकडून सदर कंपनीकडे परत पाठवले जाते. उत्पादक कंपनी असे उत्पादन दुरुस्त करून पुन्हा नव्याने बाजारात दाखल करते. अशा उत्पादनालाच ‘रिफर्बिश्ड’ म्हटले जाते. ही उत्पादने अगदी एखाद्या नव्या उत्पादनाप्रमाणेच काम करतात असा कंपन्यांचा दावा आहे. अमेझॉनने मात्र अशा ‘रिफर्बिश्ड’ फोन्सना विकताना आपल्या पॉलिसीत थोडा बदल केला आहे. अमेझॉनवरील बरीच उत्पादने ग्राहक सध्या गरज नाही असे सांगत परत पाठवतात. मात्र ‘रिफर्बिश्ड’ स्मार्टफोन्स हे कारण देऊन ग्राहकांना परत करता येणार नाहीत. आॅर्डरप्रमाणे आलेल्या उत्पादनात काही दोष असेल किंवा भलतेच उत्पादन पाठवले गेले असेल तरच ग्राहक ते परत करू शकणार आहेत. अशा वस्तूंवर सहा महिन्यांची वॉरंटी उत्पादकांकडून दिली जात असल्याचे अमेझॉनने नमूद केले आहे.

गूगलचे पर्यटन अ‍ॅप : पर्यटनाची ठिकाणे सुचवणारी, माहिती देणारी आणि अगदी प्लॅनिंगची सुविधादेखील पुरवणारी अ‍ॅप्स सध्या चांगलीच लोकप्रिय होत आहेत. आता या क्षेत्रात गूगलसारखी जायंट कंपनीदेखील उतरली आहे. यापूर्वी खरे तर गूगलचे ‘डेस्टिनेशन्स’ हे पर्यटनाच्या प्लॅनिंगला मदत करणारे फीचर उपलब्ध होतेच. हे फीचर आता डेस्कटॉपसाठी उपलब्ध करून देतानाच गूगलने आपल्या नव्या ‘ट्रिप्स’ या खास पर्यटकांसाठी उपयोगी असलेल्या अ‍ॅपची घोषणा केली आहे. हे अ‍ॅप आॅफलाइन पद्धतीने काम करत असल्याने इंटरनेट नसतानादेखील याचा वापर करता येणार आहे हे विशेष. या ‘ट्रिप्स’मध्ये नकाशे, पर्यटनस्थळांचे फोटो, आॅनलाइन तिकिटे तसेच हॉटेल बुक करणे अशा सोयी असणार आहेत. यात एक विशेष फीचरदेखील उपलब्ध असणार आहे. ते म्हणजे युजरच्या गूगल सर्च हिस्ट्रीवरून त्या युजरची आवडनिवड जाणून घेत त्या संदर्भातली माहितीदेखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. हे अ‍ॅप मोफत उपलब्ध करून देण्यात आले असून, ते सर्व प्रकारच्या स्मार्टफोन्सवर उत्तम प्रकारे काम करणार आहे.

आता ऐका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस : आपल्या युजर्सना सतत काही ना काही नवीन आणि आधुनिक देत राहण्याची व्हॉट्सअ‍ॅपला सवयच आहे आणि त्यामुळेच ते जगभर एवढे लोकप्रियदेखील आहे. नावीन्याच्या या ध्यासातूनच आता व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी ‘स्पीक’ हे भन्नाट फीचर घेऊन येते आहे. या फीचरच्या साहाय्याने आता यूजर्स चक्क आलेले मेसेजेस ऐकू शकणार आहेत. एखादा मेसेज आल्यानंतर त्याच्या बरोबरच स्पीक हा पर्यायदेखील दर्शवला जाणार आहे. त्यावर क्लिक करून हा मेसेज ऐकता येणार आहे. त्या जोडीलाच हा मेसेज डिलिट करण्याची आणि रिप्लाय, फॉरवर्ड, कॉपी करण्याचीदेखील सोय उपलब्ध असणार आहे. याबरोबरच युजर्सना आता फोटो अथवा स्टिकर्सवर लिखाण करून ती पाठवता येण्याची सोयदेखील मिळणार आहे. सध्या सर्वात आधी ही सुविधा आयओएस स्मार्टफोन्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून, लवकरच ती इतरही सर्व स्मार्टफोन धारकांना मिळणार आहे. ग्रुप चॅटिंगची आवड असणारे या फीचरच्या साहाय्याने धमाल करणार हे तर नक्कीच.

Web Title: Older New Idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.