सर्वात ज्येष्ठ भारतीय... वयाच्या ६० व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 01:59 PM2023-07-18T13:59:00+5:302023-07-21T17:22:53+5:30

मुलुंडचे शरद कुलकर्णी ठरले सर्वात वयस्कर भारतीय

Oldest Indian... Mt Everest at 60 Sir | सर्वात ज्येष्ठ भारतीय... वयाच्या ६० व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर

सर्वात ज्येष्ठ भारतीय... वयाच्या ६० व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुलुंडच्या शरद कुलकर्णी यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट यशस्वीपणे सर करण्याचा पराक्रम केला. यासह ते माऊंट एव्हरेस्ट यशस्वीपणे सर करणारे सर्वात वयस्कर भारतीय गिर्यारोहक ठरले. शरद यांनी दुसऱ्यांदा माऊंट एव्हरेस्ट सर केला असून २०१९ साली पहिल्यांदा त्यांनी ही मोहीम फत्ते केली होती. 

वयाच्या ५०व्या वर्षापासून गिर्यारोहक म्हणून सुरुवात केलेल्या शरद यांनी आपली पत्नी अंजली कुलकर्णीला श्रद्धांजली वाहण्यासाठी दुसऱ्यांंदा  माऊंट एव्हरेस्ट सर केला. २०१९ रोजी अंजली यांच्या सोबतीने शरद यांनी एव्हरेस्ट मोहीम हाती घेतली होती. यादरम्यान २२ मे २०१९ रोजी हिलरी स्टेप येथे अंजली यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या मोहिमेआधी, शरद यांनी अंजली यांच्यासोबतीने ऑस्ट्रेलियातील माऊंट कोशियुस्को आणि नंतर आफ्रिकेतील किलीमांजरो शिखर सर केले होते. परंतु, माऊंट एव्हरेस्ट या तिसऱ्या मोहिमेदरम्यान अंजली यांचा मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरणे शरद यांना कठीण होते. 

जाहिरात क्षेत्रातील व्यावसायिक असलेल्या शरद यांनी वयाच्या ५० शी नंतर जगातील सात उंच शिखरे पादाक्रांत करण्याचे निश्चित केले होते. या मोहिमेसाठी अंजली यांची मिळालेली साथ माऊंट एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान दुरावली. परंतु, मोठ्या जिद्दीने त्यांनी नव्याने सुरुवात करत पत्नीला दिलेले वचन पूर्ण करताना उर्वरित अकांकागुहा (दक्षिण अमेरिका), देनाली (उत्तर अमेरिका), एलब्रस (युरोप) आणि विन्सन (अंटार्टिका) ही चारही शिखरे यशस्वीपणे सर केली. यानंतर त्यांनी यंदा २३ मे रोजी पुन्हा एकदा माऊंट एव्हरेस्ट सर करत हिलरी स्टेप येथे अंजली यांना श्रद्धांजली वाहिली. यासह ते माऊंट एव्हरेस्ट सर करणारे सर्वात वयस्कर भारतीयही ठरले. 

 

Web Title: Oldest Indian... Mt Everest at 60 Sir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.