मुंबई : ओमायक्रॉनची लागण झालेले दोन रुग्ण मुंबईत सापडल्यानंतर टेन्शन वाढले आहे. मात्र या दोघांच्या जवळच्या संपर्कातील ४० आणि परदेशातून आल्यानंतर कोविडबाधित आढळून आलेल्या सर्व रुग्णांच्या संपर्कातील अशा एकूण ३१४ लोकांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या ११ बाधित रुग्णांच्या जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
ओमायक्रॉन संक्रमित व अन्य देशांतून १० नोव्हेंबरपासून आतापर्यंत ५,५१० प्रवासी मुंबईत आले आहेत. या प्रवाशांचा शोध घेऊन आवश्यकतेनुसार क्वारंटाईन करून वॉर्ड वॉर रूममार्फत त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तर काहींची कोविड चाचणी करण्यात आली असून, यापैकी २३ प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर त्यांच्या संपर्कातील नऊ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी परदेशातून आलेल्या दोघांना ओमायक्रॉन झाल्याचे समोर आले आहे. तर उर्वरित १४ लोकांचे अहवाल निगेटिव्ह असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पालिकेला आता उर्वरित ११ लोकांच्या अहवालाची प्रतीक्षा असून, दोन दिवसांनी चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
निकट संपर्कातील सर्व निगेटिव्ह... कोविडचा नवीन व्हेरिएंट असलेला ओमायक्रॉन विषाणू वेगाने पसरत असल्याचे परदेशात आढळून आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील लोकांची तातडीने चाचणी करण्यात येत आहे. त्यानुसार २९ बाधित रुग्णांच्या संपर्कातील ३१४ लोकांची कोविड चाचणी महापालिकेने तातडीने केली. मात्र यापैकी कोणालाच कोरोनाची लागण झालेली नाही, असे समोर आल्याने दिलासा मिळाला आहे.
सेव्हन हिल्स रुग्णालयात अडीचशे खाटा... मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात ओमायक्रॉनबाधित रुग्ण व संशयितांसाठी अडीचशे खाटा राखून ठेवल्या आहेत. तर बॉम्बे हॉस्पिटल आणि ब्रीच कँडी रुग्णालयात प्रत्येकी दहा खाटा राखून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सध्या कोविडबाधित आढळून आलेले आणि ओमायक्रॉनची लागण झालेल्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.
पुणे येथे होतेय जिनोम चाचणी... पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीची यंत्रणा आहे. मात्र या ठिकाणी एकावेळी ३५० नमुने ठेवावे लागतात. तर पुणे येथील एनआयव्ही संस्थेत केवळ ३० नमुन्यांची चाचणी शक्य होते. त्यामुळे तातडीने अहवाल मिळावेत यासाठी सर्व बाधितांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत.