मुंबई - दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नवीन प्रकाराने जगभरदहशत निर्माण केली आहे. पुढच्या महिन्यात नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीसाठी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तसेच त्यांची चाचणी करून ते नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. सध्या रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०२ टक्के एवढा आहे. तसेच सक्रीय रुग्णांची संख्याही आता तीन हजारांहून कमी आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व निर्बंध शिथिल करून जनजीवन पूर्वपदावर आणण्यात आले आहे. मात्र दक्षिण आफ्रिका आणि इस्त्रायलमध्ये कोविडचा नवीन प्रकाराचे (ओमिक्रॉन) रुग्ण आढळल्यामुळे जगभर पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
युरोप, अमेरिका, दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोविडच्या नवीन प्रकाराची माहिती मागवण्याची विनंती महापालिकेने राज्य सरकारच्या टास्क फोर्सला केली आहे. या विषाणूची लक्षणे कोणती? उपचार काय? त्याचे परिणाम किती गंभीर असतील? याबाबत माहिती मागविण्यात येत आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाईन करण्याचे, निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षित अंतर राखणे, मास्क वापरणे व नियमित हात धुण्याचे आवाहन करण्यात आले आहे.