Join us

Omicron:...तर २-३ दिवसांत मुंबईत लॉकडाऊन?; ३ दिवसांत २३० डॉक्टर्स कोरोना संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 9:04 AM

बुधवारी मुंबईत कोरोनाचे १५ हजार रुग्ण आढळले. तर मागील ३ दिवसांपासून शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये एकूण २३० डॉक्टर्स कोरोना संक्रमित झाले आहेत.

मुंबई – कोरोनाच्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटमुळे देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होतानाचं चित्र दिसत आहे. देशात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने हा व्हेरिएंट कमी घातक असला तरी त्याच्या संक्रमणाचा वेग पाहता रुग्णसंख्येत वाढ झाली तर आरोग्य व्यवस्थेवर ताण पडण्याची शक्यता आहे. त्यात मुंबईत कोरोनाची स्थिती गंभीर होताना पाहायला मिळत आहे.

बुधवारी मुंबईत कोरोनाचे १५ हजार रुग्ण आढळले. तर मागील ३ दिवसांपासून शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये एकूण २३० डॉक्टर्स कोरोना संक्रमित झाले आहेत. तर बेस्टचे ६६ कर्मचारीही कोरोनाबाधित झाले आहेत. मुंबईत गेल्या २४ तासांत १५ हजार १६६ रुग्ण आढळले. मंगळवारी १० हजार ८६० रुग्ण समोर आले. म्हणजे केवळ एका दिवसांत रुग्णसंख्या ५ हजारांनी वाढली. त्याशिवाय कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष गणेश सोळंके यांनी सांगितले की, मुंबईतील विविध हॉस्पिटलमध्ये २३० डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. अवघ्या ३ दिवसांत इतके डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य व्यवस्थेतील कर्मचारीही चिंतेत आहेत. तर मुंबईकरांनी दुसरी लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसचेही ६६ कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचं आढळलं आहे. मुंबईत १५ हजार १६६ रुग्ण आढळले त्यातील १२१८ रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल केले आहे. तर इतरांना कोरोनाची लक्षणं जाणवत नसल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. सलग ३ दिवस मुंबई ८ हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत.

...तर मुंबईत लॉकडाऊन लागणार

मुंबईत ज्या वेगाने कोरोना संक्रमितांमध्ये वाढ होत आहे हे पाहता महापालिकेनेही खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. ज्यादिवशी मुंबईत दिवसाला २० हजार रुग्ण आढळतील त्या दिवसापासून शहरात लॉकडाऊन लावण्यात येईल असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिला आहे. त्यामुळे बुधवारची आकडेवारी पाहता संक्रमणाचा असाच वेग राहिला तर मुंबईत २-३ दिवसांत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :ओमायक्रॉनकोरोना वायरस बातम्यामुंबई