मुंबई - ओमायक्रॉन संक्रमित दक्षिण आफ्रिकेसह ४० देशांमधून आतापर्यंत २८६८ प्रवासी मुंबईत आले आहेत. यापैकी ४८५ प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये आठ प्रवासी कोरोना बाधित तर एकजण संपर्कात आल्याने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आल्याने मुंबई महापालिका यंत्रणाही सतर्क झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र दक्षिण आफ्रिका व युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकारची दहशत वाढली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात मुंबईत संबंधित देशातून आलेल्या प्रवाशांचा शोध पालिकेच्या माध्यमातून घेतला जात आहे. यामध्ये ओमायक्रॉन संक्रमित ४० देशांमधून आलेल्या प्रवाशांची यादी तयार करून त्यांच्या तातडीने कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.
या चाचणीत कोरोना बाधित आढळलेल्या प्रवाशांची जिनोम सिक्वेंसिंग चाचणी केली जाणार आहे. तसेच नव्या विषाणूची माहिती देणारी ‘एस-जिन’ चाचणीही केली जाणार आहे. या चाचणीचा अहवाल शुक्रवारी येण्याची शक्यता आहे. या चाचणीमुळे पुढील कार्यवाही करण्यासाठी दिशा मिळेल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.