Omicron Variant : ओमायक्रॉन वाढल्यास डेल्टा होईल सौम्य, टास्क फोर्सच्या तज्ज्ञांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 07:59 AM2021-12-30T07:59:20+5:302021-12-30T07:59:37+5:30
Omicron Variant : कोरोना हा आरएनए विषाणू असल्याने भविष्यातही यात जनुकीय बदल होत राहणार आहेत. त्यातूनच नवनवे विषाणू येतात, त्याची तीव्रता पडताळावी लागेल.
- स्नेहा मोरे
मुंबई : डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन संसर्गाच्या आजाराचे स्वरुप सौम्य आहे. त्यामुळे ओमायक्रॉनची लाट वाढत असल्यास डेल्टासारखा घातक विषाणू मागे टाकला जाईल, असे निरीक्षण असल्याची माहिती संसर्गजन्य रोग विशेषज्ज्ञ आणि राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. वसंत नागवेकर यांनी दिली.
कोरोना हा आरएनए विषाणू असल्याने भविष्यातही यात जनुकीय बदल होत राहणार आहेत. त्यातूनच नवनवे विषाणू येतात, त्याची तीव्रता पडताळावी लागेल. बूस्टर मात्रेला दिलेल्या संमतीविषयी डॉ. नागवेकर यांनी सांगितले की, या निमित्ताने ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, त्यांच्यासाठी ही मात्रा निश्चितच उपयुक्त ठरेल. बूस्टर मात्रेनंतर एक वा दोन वर्षांच्या अंतराने कायम आपल्याला कोरोना प्रतिबंधक लसीकरण करावे लागणार आहे, असेही डॉक्टरांनी अधोरेखित केले आहे.
कोरोना कायम राहणार !
कोरोना हा आता आपल्यासोबत कायमच राहणार आहे, त्याची तीव्रता कमी होईल. मात्र मलेरियासारख्या आजाराच्या स्वरुपात ‘कोरोना’ चा प्रादुर्भाव कायम असेल असेही डॉक्टरांनी नमूद केले.
सर्जिकल मास्क, दुहेरी मास्किंग केल्यास संसर्गाचा धोका कमी
कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका असताना ‘दुहेरी मास्क’ वापरणे योग्यच असून संसर्ग दूर ठेवण्याचा हा योग्य मार्ग आहे. कारण अनेक मास्क चेहऱ्यावर योग्यरीत्या बसत नाहीत. अशावेळी दोन मास्क वापरल्याने संसर्गाची शक्यता कमी करता येईल.
निवासी डॉक्टरांच्या संपामुळे पंचाइत
दिल्लीतील निवासी डॉक्टरांना पोलिसांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ पालिकेच्या केईएम, सायन आणि राज्य शासनाच्या जे. जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप करण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारपासून बाह्यरुग्ण विभागातील सेवा आणि नियुक्तीत सेवा बंद करण्यात येणार आहेत. या तिन्ही रुग्णालयांत मिळून १७००-१८०० डॉक्टर आहेत. परिणामी, या संपामुळे ऐन कोविड वाढीच्या संसर्गात रुग्णसेवेत खंड पडण्याची शक्यता आहे.
सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण
राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे या दोघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. सुप्रिया सुळे यांनी बुधवारी ट्विट करून ही माहिती दिली. ‘मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. काळजीचे कारण नाही. पण संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या,’ असे ट्वीट त्यांनी केले.
अधिक सखोल संशोधनाची गरज
ओमायक्रॉनची संक्रमणक्षमता अधिक असली तरी, तो डेल्टापेक्षा कमी तीव्र आहे. लाँग-कोविडच्या स्वरूपात त्याचा प्रभाव समजून घेण्यासाठी आणखी संशोधन आणि पुरावे आवश्यक आहेत. या नवीन अभ्यासानुसार, ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांच्या शरीरात डेल्टाविरूद्ध रोगप्रतिकारक शक्ती चौपटीने वाढते. मात्र याच्या अंतिम निर्णयासाठी आणखी सखोल संशोधनाची गरज आहे. त्यामुळे देशाने संशोधनात अधिक गुंतवणूक केली पाहिजे. - डॉ राहुल पंडित,
राष्ट्रीय आणि राज्य कोरोना टास्क फोर्स, सदस्य