मुंबईतील ८८ प्रवाशांपैकी चार कोरोना बाधित; जिनोम सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट उद्या अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 11:54 PM2021-12-01T23:54:45+5:302021-12-01T23:55:25+5:30
Omicron Variant : परदेशातून १५ दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर एक हजार प्रवाशी उतरले. यापैकी आतापर्यत महापालिकेला ४६६ प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून मिळाली आहे.
मुंबई - कोविडचा नवीन प्रकार असलेल्या ओमायक्रॉन प्रभावित देशातून आलेल्या मुंबईतील ८८ प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. यापैकी चार कोविड बाधित असल्याचे आढळून आले आहे. यातील एकाला ओमायक्रॉनची लागण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर अन्य तीन प्रवाशांच्या जीनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल गुरुवारपर्यंत अपेक्षित असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
परदेशातून १५ दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर एक हजार प्रवाशी उतरले. यापैकी आतापर्यत महापालिकेला ४६६ प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून मिळाली आहे. यामध्ये शंभर प्रवासी मुंबईतील रहिवाशी असल्याचे आढळून आले. या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीत एक प्रवासी कोविड बाधित असल्याचे मंगळवारी आढळून आले होते.
त्यानंतर आता आणखी तीन प्रवाशांचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. तसेच शंभरपैकी १२ प्रवासी गुजरात व अन्य राज्यातील असल्याचे आढळून आले. त्यामुळे ८८ प्रवाशांची चाचणी तातडीने करण्यात आली. यापैकी बाधित आढळून आलेल्या एका प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित तीन प्रवाशांचे अहवाल प्रतीक्षेत असून गुरुवारपर्यंत याबाबत स्पष्ट होईल. अन्य राज्यातील प्रवाशांची यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आली असल्याचे काकाणी यांनी सांगितले.