तीनही मार्गांवर मंडे ब्लॉक; प्रवाशांचा खोळंबा, आजही प्रवास यथातथाच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 06:40 AM2023-11-14T06:40:36+5:302023-11-14T06:41:21+5:30
दिवाळीची सुटी असल्याने अनेक जण सोमवारी कुटुंबकबिल्यासह मुंबई दर्शनासाठी निघाले.
मुंबई : ऐन दिवाळीत प्रवाशांची अचानक कोंडी कशी करायची, याचा वस्तुपाठ मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे या तीनही मार्गांनी सोमवारी घालून दिला. रविवारी मेगाब्लॉक रद्द करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने ही कसर सोमवारी भरून काढली. तीनही मार्गांवर सोमवारी लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार चालविण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक स्थानकांवर गर्दीचे चित्र होते. आज, मंगळवारीही हाच कित्ता गिरवला जाणार आहे.
दिवाळीची सुटी असल्याने अनेक जण सोमवारी कुटुंबकबिल्यासह मुंबई दर्शनासाठी निघाले. मात्र, स्थानकावर येताच वेळापत्रक आणि प्रत्यक्ष गाडी येण्याची वेळ यांचा काहीच ताळमेळ नसल्याने हिरमोड झाला. धिम्या आणि तेज मार्गावरील सर्व गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवल्या जात असल्याची उद्घोषणा झाल्यानंतर हा उलगडा झाला.
लोकलची संख्या कमी असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. सीएसएमटी, दादर, कुर्ला, वांद्रे, अंधेरी, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी होती. तसेच तिन्ही मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत असल्याने अनेकांना कार्यालय गाठताना उशीर झाला.
आज, मंगळवारीही सुटीच्या वेळापत्रकानुसार लोकल फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना लोकल गर्दीचा सामना करावा लागणार आहे. रेल्वे नेहमीच सणासुदीच्या दिवशी सुटीच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवत असल्याने प्रवाशांना सुटीचा आनंद घेता येत नाही. रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवू नयेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.