भीमसागर लोटला चैत्यभूमीवर, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 08:00 IST2024-12-06T08:00:23+5:302024-12-06T08:00:59+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.

भीमसागर लोटला चैत्यभूमीवर, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांचा जनसागर चैत्यभूमीवर लोटला आहे. त्यामुळे अभिवादनासाठीची रांग गुरुवारी कीर्ती महाविद्यालयाच्याही पुढे अगदी प्रभादेवीपर्यंत पोहोचली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी असला तरी ५ डिसेंबरलाच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यांतील अनुयायांसह महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर अनुयायी दादर परिसरात दाखल झाले आहेत.
आंबेडकरी अनुयायांसाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने निवारा मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या आरोग्य कक्षात आणि जे. जे. रुग्णालयाच्या वतीने उभारलेल्या आरोग्यसेवा कक्षातही गुरुवारी दिवसभरात सुमारे आठ ते नऊ हजार अनुयायांनी नोंदणी करून किरकोळ उपचार घेतले. मुंबईत दाखल झाल्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गुरुवारी एक किलोमीटरहून अधिक लांबीची रांग लागली होती. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दूरवरून प्रवास करून आलो आहे, प्रवासाने थकलो असलो तरी अभिवादनाची ओढ असल्याने रांगेत उभा आहे, असे किरण सपकाळ या तरुणाने सांगितले.
महापालिकेची उत्तम व्यवस्था
चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांसाठी शासन, पालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. अनुयायांसाठी महापालिका आणि अनेक समाजसेवी संस्थांनी भोजन व्यवस्था केली आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर्स आणि फिरती शौचालये जागोजागी उभारण्यात आली आहेत. समता सैनिक दलाचे स्वयंसेवक अहोरात्र अनुयायांना मार्गदर्शन आणि मदत करीत असल्याने कुठेही गोंधळ, गैरव्यवस्था नाही, असे अभिवादनासाठी आलेल्या मालतीबाई काळे यांनी सांगितले.