मुंबई - राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी सकाळपासून ईडीने छापेमारी सुरू केली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. एका विशिष्ट समुदायाचा असल्याने माझ्यावर ही कारवाई करण्यात आली असा आरोप हसन मुश्रीफांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर लावला. त्यावर आता प्रत्युत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अनिल देशमुख, संजय राऊत कोण आहेत? असा प्रतिसवाल मुश्रीफांना विचारला.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, कोणत्याही जाती किंवा धर्माकडे बघून केंद्रीय यंत्रणा काम करत नाहीत. जर असच असेल तर मग अनिल देशमुख कोण आहेत? संजय राऊत हे ही कोण आहेत?. कोणत्याही जाती धर्मावरून नाही तर ज्यानं जे केलं आहे त्यानुसार भोगावं लागतं असा टोला लोढांनी हसन मुश्रीफांना लगावला आहे.
काय म्हणाले हसन मुश्रीफ?माझ्या घरी, माझ्या मुलीच्या घरावर, नातेवाईंकांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. मी कामानिमित्त बाहेरगावी असून मला फोनवरुन यासंदर्भात माहिती मिळाली. कारखाना, निवासस्थान आणि सगळ्या नातेवाईकांची घरं तपासण्याचं काम सुरू आहे. वास्तविक ३० ते ३५ वर्षातील माझं सार्वजनिक क्षेत्रातील जीवन आहे, यापूर्वीही २ वर्षांपूर्वी ईडीने माझ्याकडे तपासणी केली होती, तेव्हाही काही सापडलं नाही. ४ दिवसांपूर्वीच कागल तालुक्यातील भाजपचे नेते दिल्लीत चकरा मारुन माझ्याबद्दल तक्रारी करत होते.
तसेच, माझ्यावर ईडीची कारवाई होणार असल्याचंही ते सांगत होते. अशाप्रकारे नाउमेद करण्याचं काम जे चाललंय, ते अतिशय गलिच्छ राजकारण असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं. तर, यापूर्वी नबाव मलिक यांच्यावर कारवाई झाली, आता माझ्यावर कारवाई होतेय. किरीट सोमय्या म्हणातंयत अस्लम शेख यांच्यावरही कारवाई होणार आहे. म्हणजे विशिष्ठ जाती-धर्माच्या व्यक्तींवर ही कारवाई होतेय का काय? असा प्रश्नही हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला होता. दरम्यान मुश्रीफांवरील ईडी कारवाईनंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.