महामानवाला भीमगीतांनी वंदना; चैत्यभूमी परिसर गेला दणाणून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 09:31 AM2023-12-07T09:31:23+5:302023-12-07T09:33:25+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर बुधवारी लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल झाले होते.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर बुधवारी लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल झाले होते. बहुसंख्य तरुणांनी नाक्यानाक्यावर भीमगीते गायली. दादर रेल्वे स्थानकापासून शिवसेना भवन, शिवाजी पार्क आणि चैत्यभूमीच्या परिसर भीमगीतांनी दणाणून गेला होता.
असंख्य तरुणाई मुंबई आणि राज्यभरातून चैत्यभूमीवर दाखल झाली होती. वाद्यांच्या तालावर बाबासाहेबांना वंदन करणारी गाणी गायली. बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी कसे बळ दिले, शिक्षणाचा हक्क कसा दिला, अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी कसे बळ दिले, अवघ्या विश्वाला मानवतेची शिकवण देत शांतीचा कसा संदेश दिला..., अशी संदेश देणारी गाणी गात अनुयायांचे लक्ष वेधले. अनुयायी आकर्षित होत टाळ्यांनी गायकांना दाद देत होते.
कबीर कला मंच:
कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांनी गायलेल्या गाण्यांनी शिवाजी पार्क परिसरात चैतन्य, स्फूर्ती निर्माण केली होती. अनुयायी गर्दी करत मंचाच्या कार्यकर्त्यांना दाद देत होते. कार्यकर्तेही अनुयायांना आपल्या सुरात सूर मिसळण्याचे आवाहन करत होते. भर उन्हात आणि झाडांच्या गर्द सावलीत सुरू असलेल्या भीमवंदनेने चैत्यभूमीचा परिसर दिवसभर गजबजला होता.
शाहिरी कला :
शिवाजी पार्कच्या कठड्यावरील परिसरात राज्यभरातून आलेले शाहीर दिवसभर आपली कला सादर करत होते. शाहिरांकडून गायल्या जात असलेल्या गाण्यांना उपस्थित महिलाही कोरस देत होती.
एक अभियान असेही...
शांत चैत्यभूमी अभियान असेही एक अभियान शिवाजी पार्क परिसरात हाती घेण्यात आले होते. बाबासाहेबांचा संदेश परिसरात देण्यासह शांततेचे महत्त्व अभियानातून दिले जात होते. महिला वर्गाने अभियानात मोठा सहभाग घेतला होता.
मोफत भोजनदान :
दादर रेल्वे स्थानकापासून शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात मोफत भोजनदान करण्यात येत होते. अनुयायांनी भोजनासाठी शिस्त कायम राखली होती. रांगा लावून सुरू असलेले हे भोजनदान तीन दिवस सलग सुरू होते, यासाठी स्वयंसेवी संस्थांनी मदतीचे हात पुढे केले होते.