मुंबई- मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये नियोजित असलेल्या सभेवरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अद्याप या सभेला परवानगी दिलेली नाही. मात्र मनसे औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेण्यावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज सभा होणाऱ्या मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासन सभेला नक्कीच परवानगी देतील, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. पोलिसांना आम्ही सहकार्य करु, असंही त्यांनी सांगितलं. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये नियोजित असलेल्या सभेवरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.
१ मे रोजी सायंकाळी औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे. मात्र अशातच १ मे रोजीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील पुण्यात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी लवकरच जाहीर सभा घेऊन विरोधकांचा समाचार घेणार असल्याचे सांगितले होते.
एबीपी माझाच्या वृत्तानूसार, उद्धव ठाकरे १ मे रोजी पुण्यात जाहीर सभा घेऊन विरोधकांचा चांगलाच समाचार घेणार आहे. राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यावरुन आक्रमक भूमिका घेतली असून भोंगे हटवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी यावरून राज्य सरकारवरही टीका केली आहे. तसेच या मुद्द्यावरुन भाजपाने उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उभा केले आहेत. आता या सर्व टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे. पुण्यातील १ मे रोजीच्या सभेत उद्धव ठाकरे या सर्व टीकेचा आणि विरोधकांचा समाचार घेणार आहेत.
मनसेच्या सभेला पोलिसांची अजूनही परवानगी नाही-
१ मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला अजूनही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. उद्या याबाबत पोलीस प्रशासन निर्णय घेतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मनसेच्या होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू झाल्याचे वृत्त आले होते. मात्र औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी काल दिली होती. औरंगाबादेत आजपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात आलं होतं. हे वृत्त चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.