मुंबई – महापालिकेने उपनगरात मालाड पूर्वेतील मालाड हिल जलाशयात इनलेट आणि आउटलेट व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेतले आहे. ९ आणि १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत दोन टप्प्यात दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या कामामुळे गोरेगाव, मालाड आणि कांदिवली या भागात दोन दिवशी १६ तास पाणीपुरवठा होणार नाही.
जुने व खराब झाल्याने एकूण १० पाण्याचे व्हॉल्व्ह बदलण्याचं काम महापालिकेने घेतले आहे. पहिल्या टप्प्यात, ९०० मिमी व्यासाचे ३ बटरफ्लाय व्हॉल्व्ह आणि सोमवारी ७५० मिमी व्यासाचे व्हॉल्व्ह बदलण्यात येतील. कामाच्या दुसऱ्या टप्प्यात १३ ऑक्टोबर रोजी ९०० मिमी व्यासाचे आणि ७५० मिमी व्यासाचे दोन वॉटर व्हॉल्व्ह बदलण्यात येणार आहेत.
मालाड (पूर्व), गोरेगाव (पूर्व), बाणडोंगरी, झालवाड नगर, अशोक नगर (काही भाग), लोखंडवाला, हनुमान नगर, वडारपाडा - 1 आणि 2, नरसीपाडा कांदिवली (पूर्व) या भागात सकाळी ८ ते मध्यरात्री १२ या दोन दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. या काळात रहिवाशांनी पुरेसा पाणीसाठा करून त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.