पवारांचा राजीनामा अन् पुण्यातील वज्रमुठ सभेवर प्रश्नचिन्ह; नाना पटोलेंचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 01:50 PM2023-05-03T13:50:53+5:302023-05-03T13:53:52+5:30
महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यभर वज्रमुठ सभा घेण्याचा निर्णय एकीकडे घेण्यात आला आहे.
मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला घडविणारे आणि अडीच वर्षांपर्यंत तो यशस्वीपणे पार पाडणारे महाविकास आघाडीचे जनक व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडी कमकुवत होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सामना रंगल्याचं दिसून आलं होतं. आता, पुन्हा एकदा या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यवर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वज्रमुठ संभेसंदर्भात महत्त्वाचं आणि मोठं विधान केलं आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यभर वज्रमुठ सभा घेण्याचा निर्णय एकीकडे घेण्यात आला आहे. मात्र, शरद पवार यांच्या निर्णयामुळे पुढील सभांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मुंबईतील बीकेसी मैदानावर वज्रमुठ सभा मोठ्या उत्साहात पार पडली. मात्र, या वज्रमुठ सभेची चर्चा एका रात्रीतच हवेत विरली. कारण, शरद पवार यांनी राजीनाम्याचा बॉम्ब टाकल्यामुळे सगळं लक्ष राष्ट्रवादी व शरद पवार यांच्याकडेच वेधलं गेलं आहे. या घटनांवर महाविकास आघाडीतील सहाकारी पक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेनेनंही आपलं मत व्यक्त केलं आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभांचंही पुढे काय होणार, हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पुण्यातील वज्रमुठ सभेबद्दल विचारलं असता, पावसामुळे सभेबाबतचा निर्णय एकत्रित बैठक घेऊन घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात सध्या विविध ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची याबाबत लवकरच बैठक होईल. याबाबत बैठकीत निर्णय होईल. पुण्यातील वज्रमुठ सभा होईल की नाही याबाबत आताच सांगता येणार नाही, असे विधान नाना पटोले यांनी केले. नानांच्या या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. एकाकडी पवारांचा राजीनामा आणि दुसरीकडे पुण्यातील सभेबाबत नानाचं हे विधान आता सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं आहे.
छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबईनंतर आता पुण्यात याच महिन्यात ही वज्रमुठ सभा होत आहे. या सभेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या सभेसाठी शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने पुणे शहरातील नेत्यांची बैठक पार पडली. तर, पुढेही बैठक होणार आहेत. मात्र, तत्पूर्वीच नाना पटोले यांनी पावसाचं कारण देत सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
वज्रमुठ नसून हातातील वाळू
जशी समुद्राची वाळू मुठीत घट्ट पकडल्यानंतर ती तितक्याच्या वेगाने ढीली होते. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीची वज्रमुठ म्हणजे समुद्रातील वाळू घट्ट धरल्यानंतर जशी हातातून निसटते तसा प्रकार आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आधीच निम्मा कार्यक्रम केला आहे, असे म्हणत भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभांवर टीका केलीय.