मुंबई- राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता खरी राष्ट्रवादी कोणाची यावरुन केंद्रीय निवडणूक आयोगात वाद सुरू आहे. याबाबत काल निवडणूक आयोगात सुनावणी झाली, यानंतर खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांसमोर आरोप केले. या आरोपांना आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले,"एकीकडे तुम्ही शरद पवारांना दैवत म्हणता आणि दुसरीकडे त्यांना पक्षातून बाहेर काढता, असं प्रत्युत्तर आमदार आव्हाड यांनी दिले.
अजित पवारांनी एकदाही पक्षाचं पद उपभोगलं नाही; आव्हाडांची टीका, दादा गटाचाही पलटवार
काल खासदार सुनिल तटकरे यांनी खासदार शरद पवार यांच्या खासदारकीबाबत कोणताही अर्ज करणार नाही, ते आमचे दैवत असल्याचं म्हटले होते. यावर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, काल तटकरे साहेब तुम्ही परत एकदा शरद पवारांना दैवत म्हणालात. कशाला त्यांना दैवत म्हणून अपमान करता. त्यांचा पक्ष तुम्हाला ताब्यात पाहिजे, त्यांची निशाणी तुम्हाला पाहिजे. हे बेगडी प्रेम दाखवू नका, वैर दाखवायचं तर समोरा समोर घ्यायचं, असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
"तुम्ही पहिल्या दिवशी राष्ट्रवादीत आले नाहीत, खूप विचार करुन तुम्ही आलात. तुम्हाला दुसरीकडे पर्याय नव्हता म्हणून तुम्ही राष्ट्रवादीत आलात. तुम्हाला पहिलं तिकीट अंतुले साहेबांनी दिलं त्यांच्याच विरोधात तुम्ही गेलात. तुम्ही बरोबर बोललात राजकारणात वयाचा आणि नात्यागोत्याचा काहीच संबंध नसतो, असा टोलाही आमदार आव्हाड यांनी लगावला. ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला मंत्रिपद दिलेअध्यक्षपद दिलं त्या पवार साहेबांना तुम्ही पक्षा बाहेर काढायला निघालात. आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्ही त्यांना दैवत म्हणू नका, असंही आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. आम्हाला माहित आहे तुम्हाला शरद पवार साहेबांचं राजकारण संवण्याची सुपारी मिळाली आहे, ती तुम्ही वाजवत बसा, अशी टीका आव्हाड यांनी सुनिल तटकरे यांच्यावर केली.