Join us  

२१ सप्टेंबरला शिवसेनेचा गोरेगावात मेळावा, ठाकरे तोफ पुन्हा गरजणार

By मनोहर कुंभेजकर | Published: September 12, 2022 7:30 PM

आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना सज्ज झाली आहे.

मुंबई- आगामी पालिका निवडणुकीच्या तयारी साठी शिवसेना सज्ज झाली आहे. येत्या दि,२१ सप्टेंबर रोजी गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुलात शिवसेनेचा मेळावा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन यावेळी होणार आहे. सुमारे ३५००० जण मावतील असा मोठा हॉल या मेळाव्यासाठी बुक करण्यात आला आहे.

यावेळी शक्ति प्रदर्शन करत चलो गोरेगाव असा नारा देत शिवसैनिक या मेळाव्यात सहभागी होतील. मुंबईतील शिवसेना नेते, विभागप्रमुख,शिवसेना उपनेते, विधानसभा संघटक,विधानसभा समन्वयक,उपविभागप्रमुख,शाखाप्रमुख, गटप्रमुख आदी मुंबईचे सुमारे ३० ते ३५ हजार पुरुष व महिला पदाधिकारी यावेळी सहभागी होणार आहे.सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेच्या मुंबईतील २२७ शाखां मधून जोरदार तयारी व बैठकांचे सत्र सुरू झालेय.

या मेळाव्याची तयारी करण्यासाठी एक आढावा बैठक कालरात्री गोरेगाव पश्चिम एस.व्ही.रोड येथील शिवसेना शाखेत आयोजित केली होती. यावेळी शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, खासदार व शिवसेना नेते अरविंद सावंत, माजी मंत्री व विभागप्रमुख अँड.अनिल परब,शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,आमदार,विभागप्रमुख सुनील प्रभू,आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी या सभेची जबाबदारी  वाटून देण्यात आली आहे.

या मेळाव्यात आगामी पालिका निवडणुकीची तयारी, शिवसेनेचा दसरा मेळावा, शिवसेनेने सर्व काही देवून सुद्धा आमदारांनी केलेली गद्दारी,शिवसेनेचा न्यायालयात सुरू असलेला लढा, दादरमध्ये शिवसेना व शिंदे गटात झालेला राडा यावर उद्धव ठाकरे हे भाष्य करतील आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेचे जोरदार आसूड ओढतील, आगामी मुंबई महापालिकेच्या  निवडणुकीत भगवा फडकवण्या साठी सज्ज राहा असे आवाहन ते या मेळाव्यात हजारोंच्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांना करतील असे संकेत मिळत आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना