Join us  

सोशल मीडियावरही रामनामाचा जागर; रामभक्तीची मोहिनी पोहोचली सातासमुद्रापार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 9:43 AM

कलाकृतीतून केले प्रेम व्यक्त.

मुंबई : अयोध्येत राममंदिराचा सोहळा रंगत असताना दुसरीकडे सोशल मीडियाही राममय झाले आहे. अक्षरशः प्रसाद, मंदिराच्या प्रतिकृती, भजन, गाणी, कविता, वेशभूषा, नृत्य, कथा, वाचन अशा वेगवेगळ्या स्वरूपांत सोशल मीडियावर नेटीझन्स रामांविषयीचे आपले प्रेम व्यक्त करीत आहेत. एवढेच नव्हे तर या रामभक्तीची मोहिनी आता देशातच नाही तर सातासमुद्रापारही पोहोचली आहे. परदेशांतील नागरिकांसह अनेक क्षेत्रांतील विविध कलाकारही आपल्या कलाकृतींतून रामनामाचा जागर करीत आहेत.

वांद्रे-वरळी सी लिंकदेखील भगवान श्रीरामाच्या जयघोषाने उजळून निघाले आहे. सी-लिंकच्या केबलवर लेझर लाइटद्वारे भगवान श्रीरामांचे चित्र दाखवण्यात आले आहे. हे नयनरम्य दृश्य पाहून तेथून जाणारे लोक भक्तिरसात तल्लीन होत आहेत. हे एक अद्भुत दृश्य असल्याची प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहेत, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर ५०० रुपयांच्या नोटेचा एक फोटो व्हायरल होत आहे. या नोटेवर गांधीजींऐवजी श्रीरामाचा फोटो दिसत आहे. नोटेच्या दुसऱ्या बाजूला धनुष्यबाणाचे चित्र आणि राममंदिराचा फोटो दिसत आहे. हा फोटो एडिट करण्यात आला असून नेटीझन्स याचे कौतुक करत आहेत.

जर्मन गायिकेने गायिले श्री रामाचे भजन :

कॅसांड्रा मे स्पिटमन या जर्मन गायिकेचा श्री रामाचे भजन गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात गायिका ‘राम आयेंगे तो अँगना सजाऊँगी’ हे गाणे गाताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गायिका कॅसांड्राच्या गाण्यांचे कौतुक केले आहे. 

छोटन घोष या तरुणाने बिस्किटांपासून राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. ही कलाकृती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

बिस्किटांपासून राममंदिराची प्रतिकृती :

एका तरुणाने बिस्किटांपासून राममंदिराची प्रतिकृती साकारली आहे. बिस्किटांपासून राममंदिराची प्रतिकृती बनवणाऱ्या या तरुणाचे नाव छोटन घोष असे आहे. चार बाय चार फुटांची ही प्रतिकृती बनवण्यासाठी त्याने २० किलो बिस्किटांचा वापर केला आहे. हे मंदिर बनवण्यासाठी त्याला पाच दिवस लागले. टांझानियाच्या किली पॉलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘राम सिया राम’ गाताना दिसत आहे. पॉलचा हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे, त्याचबरोबर अनेक युजर्सनी मोठ्या संख्येने यावर प्रतिक्रियादेखील दिली आहे.

नेटीझन्स मंत्रमुग्ध :

 हंगेरीतील एक रामभक्त इतर भाविकांबरोबर ‘रघुपती राघव राजा राम’ हे भजन गाताना दिसतो. तो केवळ गातच नाही, तर नाचत रामभक्तीत तल्लीन झाल्याचेही दिसते.

 तर दुसरीकडे, सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडीओत एक शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांसह राम आयेंगे गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. विद्यार्थी आणि शिक्षिकेचे नृत्य पाहून नेटीझन्स मंत्रमुग्ध झाले आहेत.

टॅग्स :मुंबईराम मंदिरअयोध्या