Join us

"अजित पवार, दिलीप वळसे पाटील, विश्वास नांगरे पाटील यांची नार्को टेस्ट करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 17:16 IST

वळसे पाटील, अजित पवार आणि विश्वास नांगरे पाटील यांची नार्को टेस्ट करा. कट काय होता ते लक्षात येईल अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये टाकण्याचा डाव मागील सरकारने आखला होता असा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणात उडी घेत थेट अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यावर आरोप करत यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली आहे. 

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा कट कुठे रचला हे मी सांगतो, दिलीप वळसे पाटील तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. वळसे पाटील, अजित पवार आणि विश्वास नांगरे पाटील यांची नार्को टेस्ट करा. कट काय होता ते लक्षात येईल. मी जेलमध्ये गेल्यानंतर एक बैठक नेत्यांची आणि पोलीस अधिकाऱ्यांची झाली होती. त्या बैठकीत आता जेलमध्ये असणारे संजय पांडेही होते. या बैठकीनंतर ज्याप्रकारे चौकशी चालवली होती. त्यातून देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला असा आरोप त्यांनी केला. तसेच नागपूर कनेक्शन उल्लेख यासाठी केला गेला ज्यामुळे देशहितासाठी, हिंदुस्तानासाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि देवेंद्र फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचं होते असा आरोपही वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. 

काय होता देवेंद्र फडणवीसांचा आरोप? महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा कट आखला होता, हे काम तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले गेले होते असा आरोप फडणवीसांनी केला होता. ते म्हणाले होते की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीचे प्रयत्न झाले. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा, आत टाका असे टार्गेटच तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आले होते असं त्यांनी सांगितले. तसेच मी दिलीप वळसे पाटलांवर कुठलाही आरोप केला नाहीये. हा जो आदेश आला होता, तो वळसे पाटलांकडून आलेला नव्हता. तो वरुन आलेला होता, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.  

टॅग्स :गुणरत्न सदावर्तेअजित पवारदिलीप वळसे पाटीलदेवेंद्र फडणवीस