Join us  

काेर्टाच्या आदेशालाच फटाका; मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवलीत मध्यरात्रीपर्यंत धडाडधूम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 6:48 AM

फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता घसरली, तसेच मोठे आवाज करणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषणही वाढले. 

मुंबई/ठाणे/नवीमुंबई/मीरा रोड : मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी मुंबई महापालिकेसह वेगवेगळ्या यंत्रणांना जबाबदार धरत मुंबई उच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० असे दोनच तास फटाके उडवण्यास दिलेली परवानगी मुंबई महानगर क्षेत्रात अवघ्या दोनच दिवसांत धुडकावून लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातही धनत्रयोदशीपेक्षा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्यात आल्याच्या सर्वाधिक तक्रारी आल्या.

अनेक भागांत बॉम्ब, फटाक्यांच्या माळा लावल्याने मध्यरात्रीपर्यंत कानठळ्या बसत होत्या. मुंबईत शिवाजी पार्क, मरिन ड्राइव्ह, कुलाबा परिसरात नियमांचे सर्वाधिक उल्लंघन झाले. फटाक्यांच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता घसरली, तसेच मोठे आवाज करणाऱ्या फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषणही वाढले. 

संध्याकाळी सहा ते रात्री दीडठाणे : शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे हित डोळ्यासमोर ठेवून न्यायालयाने केवळ दोन तास फटाके फोडण्याचे घातलेले बंधन ओलांडून येथील नागरिकांनी सायंकाळी सहा ते मध्यरात्री दीड-दोन वाजेपर्यंत फटाके फोडले. ठाण्यातील उच्चभ्रूंच्या वस्तीत तसेच डोंबिवलीतील सुशिक्षितांच्या सोसायट्यांमध्ये मुख्यत्वे फटाके फोडण्यात आले, हे विशेष धक्कादायक. ठाणे जिल्ह्यात शुक्रवार, शनिवारी झालेल्या पावसांच्या सरींमुळे हवेची गुणवत्ता सुधारली होती. मात्र रविवारच्या अनिर्बंध फटाके फोडण्यामुळे ती घसरली. 

बॉम्बवर्षावासारखे फाेडले फटाकेकल्याण : कल्याणमधील प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ध्वनी प्रदूषणाचा मासिक अहवाल तयार होत असल्याने त्यांनी तपशील दिला नाही.  उल्हासनगर शहरात हवेची गुणवत्ता एमएमआर क्षेत्रात सर्वात खराब ३०१ इतकी नोंदवली गेली. येथे रात्री उशिरापर्यंत अक्षरश: बॉम्बवर्षाव सुरू असल्यासारखे फटाके फोडत होते.भिवंडीतील डाइंग, सायझिंगमुळे प्रदूषणात वाढ असताना फटाक्यांनी त्यात भर घातली. अंबरनाथ, बदलापूरमध्येही फटाक्यांनी आवाज व वेळेचे बंधन पाळले नाही. 

पालघरमध्येही फटाकेबाजीपालघर/वसई : पालघर जिल्ह्याच्या काही भागांत महापालिकेच्या परिसरात दिवाळीनिमित्त रात्री उशिरापर्यंत फटाके फोडले गेले. यामुळे हवेतील प्रदूषण, ध्वनिप्रदूषण वाढले. मीरा-भाईंदरमध्ये ३२ ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावर फटाक्यांमुळे दुचाकी जळून खाक झाली. मीरा-भाईंदरमध्ये फटाके फोडण्याची वेळ ठरवून देऊनही त्याला काडीचे महत्त्व न देता रविवारी बहुतांश लोकांनी सायंकाळपासून मध्यरात्र उलटून गेल्यानंतरसुद्धा सर्रास कानठळ्या बसवणारे फटाके फोडले. वसईतील नऊ प्रभागांत नऊ वायुप्रदूषण नियंत्रक पथकांची नियुक्ती मनपा आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केली होती, पण त्यांनी बघ्याची भूमिका केल्याचे चित्र वसईत दिसून आले. वसईतील नालासोपारा, विरार, नायगाव शहरांसह ग्रामीण भागात लक्ष्मीपूजनच्या दिवसा व रात्रभर मर्यादेव्यतिरिक्त फटाकेबाजी करण्यात आली.

नवी मुंबईतही रात्रभर आवाजनवी मुंबई : दिवाळी आणि विश्वचषक सामन्यांमुळे नवी मुंबईत गेल्या दोन दिवसांत मध्यरात्रीपर्यंत फटाके फोडले गेले. लक्ष्मीपूजनाच्या रात्री मध्यरात्री अडीचपर्यंत फटाक्यांचे आवाज दणाणत होते. फटाक्यांमुळे ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ व सीबीडी आगीच्या घटना घडल्या. यात गवताला आग लागण्याच्या घटना अधिक आहेत.

गेल्या दोन दिवसांत काय घडले?फटाक्यांच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईत ७८४ गुन्हे नोंदवत ८०६ जणांवर कारवाई. 

रायगडमध्ये ‘लक्ष्मी’बार अलिबाग : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रायगडमध्ये रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात फटाके उडविण्यात आले. आकाशातही फटाक्यांची रोषणाई पाहायला मिळाली. मात्र यामुळे जिल्ह्यातील हवेच्या प्रदूषणात काही प्रमाणात वाढ झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाचे अधिकारी जे. एस. हजारे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्याच्या शहरी भागात लक्ष्मीपूजनाला फटाक्यांची सर्वाधिक आतषबाजी करण्यात आली. 

न्यायालयाचा निर्णय काय होता?

मुंबई महानगर प्रदेशात उच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगीही दिली. त्याआधी ६ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने रात्री ७ ते १० या दरम्यान फटाके फोडण्यास परवानगी दिली होती. मात्र, हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होत नसल्याने न्यायालयाने शुक्रवारच्या आदेशात फटाके फोडण्याच्या वेळेत कपात केली. मूळात फटाके वाजविण्यास बंद घालण्याची मागणी करणारी याचिका होती. मात्र, नागरिकांच्या भावनांचा विचार करत न्यायालयाने फटाके फोडण्याच्या वेळेवर बंधन घातले. निरोगी हवा हवी आहे की, फटाके फोडायचे आहेत, हे नागरिकांनी ठरवावे, असे म्हणत न्यायालयाने ही जबाबदारी नागरिकांवर सोपवली.

 

टॅग्स :फटाकेमुंबईपोलिस