महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना ठिकठिकाणी अभिवादन...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 09:43 AM2023-12-07T09:43:15+5:302023-12-07T09:44:15+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अभिवादन करण्यात आले.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अभिवादन करण्यात आले. यानिमित्त त्यांच्या प्रतिमांना वंदन, त्यांच्यावरील ग्रंथांचे वितरण, विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन तर करण्यात आलेच शिवाय काही मागण्याही अनुयायांकडून करण्यात आल्या.
संविधान बचाव अभियान :
लोकशाही मूल्यांवर आधारित भारतीय संविधान काही लोक धोक्यात आणू पाहत आहेत. त्या विरोधात ‘संविधान बचाव अभियान’ राबविण्यात येत आहे. नागरिकांमध्ये संविधानाची जागृती करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट असल्याचे संविधान बचाव आघाडीचे प्रमुख संयोजक राजेश सोनवणे यांनी सांगितले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी परिसरात संविधान बचाव रॅलीसुद्धा काढण्यात आली.
महापारेषणमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजीव कुमार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संचालक (संचलन) संदीप कलंत्री, संचालक (प्रकल्प) सुनील सूर्यवंशी, संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे, मुख्य अभियंता सुनील शेरेकर, जुईली वाघ, भूषण बल्लाळ, मुख्य महाव्यवस्थापक मंगेश शिंदे, मुख्य विधि सल्लागार डॉ. कीर्ती कुळकर्णी, उपमहाव्यवस्थापक नितीन कांबळे उपस्थित होते.
शिक्षण आमच्या हक्काचे :
भारतीय लोकसत्ताक संघटना शिक्षण हक्क चळवळच्या वतीने ‘शिक्षण आमचा अधिकार, बंद
करा त्याचा व्यापार’ अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या.
भारतीय संविधानानुसार, शिक्षण मोफत असताना विकत का घ्यावे लागते? शिक्षणाच्या दर्जाबाबत भेदभाव का केला जातो? शिक्षणाचा बाजार का केला जातो? शिक्षणाचे बाजारीकरण का करण्यात आले आहे, असे असंख्य सवाल संघटनेच्या वतीने शिवाजी पार्कात उभारण्यात आलेल्या स्टॉलवर करण्यात येत होते.
अनुयायांची मागणी :
राज्य सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला.
मग त्याच धर्तीवर कोट्यवधी भीम अनुयायांची मागणी असूनही दादर स्थानकाचे नामांतर ‘चैत्यभूमी’ असे करावे, अशी मागणी मुंबई प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वर्षा गायकवाड यांनी चैत्यभूमी येथे दाखल होत केले.
यावेळी ही मागणी त्यांनी केली.
भाजप प्रदेश कार्यालयात :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार स्मिता वाघ, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, भाजप मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश प्रवक्ता अवधूत वाघ, प्रदेश
कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.
गुलाबपुष्प अर्पण :
विधानभवनाच्या प्रांगणात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव उमेश शिंदे यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अशोक आगिवले, सोमेश्वर चौगुले व कर्मचारी वर्गानेही अभिवादन केले.
संविधान उद्देशीकेचे वाटप :
म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना संविधान उद्देशीकेचे वाटप करण्यात आले.
१,६०० हून अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला :
डॉ.आंबेडकर मेडिकोज असोसिएशन, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे जे हॉस्पिटलतर्फे शिवाजी पार्क येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. १९७८ मध्ये सुरू केलेला हा उपक्रम जोमाने सुरू आहे. शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
१,६०० हून अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, पेडियाट्रिक्स, गायनोकोलॉजी, डरमॅटोलॉजी, ऑफथॅलमोलोजी, ऑर्थोपेडिक्स इ. डॉक्टर्सनी रुग्णसेवा दिली. डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशनच्या अध्यक्ष सायली हिवराळे यांच्या नेतृत्वात शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आंदोलन...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादर रेल्वे स्टेशनला मिळाले पाहिजे या मागणीसाठी भीम आर्मीने आंदोलन केले, अशी माहिती भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिली.
अन्नदान...
प्रज्ञा फाऊंडेशन आणि बहुजन शक्ती या सामाजिक संस्थेतर्फे अनुयायांना अन्नदान वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रज्ञा फाऊंडेशन आणि बहुजन शक्तीचे परेश मोटे, तुळशीराम मगरे, बाबासाहेब साबळे, रवी मोरे, सुशील शरणागत, समाधान सावंत, शुभम वारे, दिपक मोरे, उमेश जाधव, गोरख साबळे यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले.