ऐन दिवाळीच्या तोंडावर ३०० किलोहून अधिक भेसळयुक्त खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

By स्नेहा मोरे | Published: November 5, 2023 06:48 PM2023-11-05T18:48:35+5:302023-11-05T18:49:23+5:30

सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांमधील भेसळीचे प्रमाण वाढते.

On the eve of Diwali, more than 300 kg of adulterated Khawa seized Action by the Food and Drug Administration | ऐन दिवाळीच्या तोंडावर ३०० किलोहून अधिक भेसळयुक्त खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

ऐन दिवाळीच्या तोंडावर ३०० किलोहून अधिक भेसळयुक्त खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई - सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांमधील भेसळीचे प्रमाण वाढते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन अधिक सतर्कपणे यावर लक्ष ठेवून असते. या पार्श्वभूमीवर , दिवाळीच्या तोंडावर परराज्यातून मुंबई, पुणे आणि ठाण्यात आलेला सुमारे ३०० किलोपेक्षा अधिक भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने याप्रकरणी पोलीसांसह कार्यवाही करत असून नागरिकांनी याबाबत जागरुक असावे असे आवाहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. राजस्थान व गुजरात या भागातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थ राज्यात येतात. त्यामुळे याबाबत माहिती मिळताच शुक्रवारी पालघर जिल्ह्यात तपासणी नाक्यावर खवा वाहतूक करणारी एक खाजगी ट्रॅव्हल बसवर कारवाई करण्यात आली आहे.

सणासुदीच्या दिवसामध्ये अन्नपदार्थामध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही . भेसळयुक्त मिठाईबाबतची सातत्याने तपासणी करून कारवाई केली जात आहे. यासाठी तेरा पथके शहरात कार्यरत आहेत, वारंवार तपासणी सुरू आहे. तरीही ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना काळजी बाळगावी. तक्रार असल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी केले आहे. नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन संबंधित अन्न पदार्थांचा उर्वरित साठा जप्त करून परवाना धारकांच्या ताब्यात पुढील आदेश होईपर्यंत ठेवण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेले सर्व अन्न नमुने हे अन्न विश्लेषक, अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेले असून विश्लेषण अहवाल प्रथम प्राधान्याने देण्याबाबत कळविण्यात आले आहे. तपासणी अहवालामध्ये आढळून आलेल्या गंभीर त्रुटींबाबत तपासणी अहवाल पुढील योग्य त्या कायदेशीर कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अशी ओळखा भेसळ
मिठाई वा खवा तळहातावर घेऊन रगडा. तो जर कोरडा न होता तेलकट वा वास आला तर भेसळ समजावी. मिठाईचा तुकडा तोंडात टाकताच, तेलकट वाटला तर त्यात भेसळ समजावी. मिठाई वा खव्यावर टिंचर आयोडिनचे दोन थेंब टाका. भेसळ नसल्याने त्यावर काहीही परिणाम होणार नाही. भेसळ असल्यास थेंबाची जागा काळसर होईल. मिठाई वा खव्यावर हायड्रोलिक ऍसिड टाका. मिठाईचा रंग जांभळा झाल्यास त्या मिठाईत मिटॅनील हे रसायन वापरल्याचे सिद्ध होईल. भेसळयुक्त मिठाई खाल्ल्यानंतर काही वेळात मळमळ, उलटी व जुलाब सुरू होतात.भेसळयुक्त मिठाईमध्ये शुद्ध खव्यापासून न बनविता, अर्ध्याप्रमाणात खावा, त्यात मैदा वा अन्य पिठ वापरले जाते. त्यात काही रासायनिक पदार्थही वापरले जातात. त्यामुळे त्यात खव्याप्रमाणे चिकटपणा येऊ शकेल. तसेच साखरेचे प्रमाण मात्र बनावट खव्यात बिघडते, त्यामुळे बनावट मिठाई चविष्ठ राहत नाही.

Web Title: On the eve of Diwali, more than 300 kg of adulterated Khawa seized Action by the Food and Drug Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई