मंत्रालयातील जाळीवर उड्या, प्रकल्पग्रस्तांच्या अचानक आंदाेलनाने उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 09:50 AM2023-08-30T09:50:44+5:302023-08-30T09:51:01+5:30
पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाने मंत्रालयात पुन्हा खळबळ उडाली. विदर्भातील अपर वर्धा प्रकल्पग्रस्त चौघांनी मंगळवारी मुख्य इमारतीच्या चौकात असलेल्या सुरक्षा जाळीवर उडया मारल्या. जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मंत्रालयात चाळीसहून प्रकल्पग्रस्त आंदोलक मंत्रालयात आले होते. जाळीवर चार आंदोलनकर्त्यांनी उडया मारल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा करुन १५ दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
आंदोलन कशासाठी
अपर वर्धा प्रकल्पासाठी आमच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. आम्ही अनेक दिवसांपासून निवेदने देत आहोत. १०३ दिवसांपासून आमचे आंदोलन सुरू आहे. मात्र आमच्या मागण्यांकडे कोणीही लक्ष दिले नाही. आज मंत्रालयात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघेही उपस्थित असल्याने आम्ही हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे आंदोलनकर्त्यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.
सुरक्षा अन् गुप्तचर यंत्रणेचे अपयश उघड
मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयशही या निमित्ताने समोर आले. आंदोलकांनी काही दिवसांपूर्वीच पत्रके छापली होती व त्यात मंत्रालयात आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले होते. या बाबतची माहिती गुप्तचर यंत्रणांना कशी मिळाली नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला. तसेच, चाळीसहून अधिक आंदोलक मंत्रालयात आले त्यांनी बॅगांमध्ये दोन ते अडीच हजार पत्रके आणली, बॅनरही आणले. तरीही सुरक्षा यंत्रणेच्या ते लक्षात आले नाही.