लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात सलग दुसऱ्या दिवशी मुंबई रेल्वेच्या प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त शहाजी निकम यांची चौकशी झाली. त्यांच्या चौकशीत, तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्त कैसर खालीद यांच्या कार्यकाळात होर्डिंगच्या आकारमानात आणि कंत्राटाच्या मुदतीत वाढ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत गुन्हे शाखेने अटक केलेला इगो मीडिया प्रा. लि. संचालक भावेश भिंडे याच्या कोठडीत न्यायालयाने बुधवारी एका दिवसाची वाढ केली. तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या कार्यकाळात जानेवारी, २०२१ मध्ये टेंडर प्रक्रिया राबवून ४० X ४० फुटांच्या तीन होर्डिंग उभारण्याची परवानगी दिली होती. हे टेंडर भिंडेच्या कंपनीला १० वर्षांच्या मुदतीसाठी मिळाले होते. सेनगावकर यांच्या बदलीनंतर फेब्रुवारी, २०२१ मध्ये कैसर खालीद यांनी रेल्वे पोलिस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली.
खालीद यांच्या कार्यकाळात ७ डिसेंबर २०२१ रोजी ४० X ४० फुटांच्या तीन होर्डिंगचे आकारमान ८० X ८० करण्याची परवानगी देण्यात आली. ७ जुलै २०२२ रोजी टेंडर मुदतीचा कालावधी १० वर्षांवरून वाढवून ३० वर्षे केला. तिन्ही होर्डिंगप्रमाणेच आणखी एक होर्डिंग उभारण्यासाठी भिंडे याच्या कंपनीने रेल्वे पोलिस आयुक्तालयाकडे अर्ज केला. हेच ते दुर्घटनाग्रस्त होर्डिंग आहे. १६ डिसेंबर २०२२ रोजी कैसर खालीद यांच्या बदलीचे आदेश निघाले. बदली आदेश निघाल्यानंतर खालीद यांनी रविवारी १८ डिसेंबर २०२२ रोजी होर्डिंगला परवानगी देण्याच्या फाइलवर सही केली. चौथ्या होर्डिंगचे आकारमानही वाढवून शेवटच्या दिवशी १४० X १२० X २ = ३३ हजार ६०० चौरस फूट एवढे अवाढव्य करण्यात आले.
दुर्घटनाग्रस्त होर्डिंगमधून सर्वाधिक पैसे...
ई टेंडर प्रक्रिया राबवून उभारण्यात आलेल्या तीन होर्डिंगच्या माध्यमातून रेल्वे पोलिसांना दर महिन्याला एकूण १३ लाख रुपये मिळत होते, तर दुर्घटनाग्रस्त होर्डिंगच्या माध्यमातून दर महिन्याला ११ लाख ३४ हजार रुपये भाडे मिळत होते, असे गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे.
भिंडेचे मुंबईत २८ होर्डिंग
भिंडेच्या इगो मीडिया प्रा.लि. या कंपनीचे संपूर्ण मुंबईत २८ होर्डिंग असून त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित इतरदेखील होर्डिंग आहेत. आरोपीच्या होर्डिंगच्या उत्पन्नातून मिळवलेला आर्थिक लाभ त्याने इतर कोणत्या व्यक्तींकडे वळविलेला आहे. याबाबत त्याच्याकडे तपास करणे बाकी आहे. मात्र, भावेश भिंडे तपासात सहकार्य करत नसल्याचेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले. गुन्हे शाखेला प्रतीक्षा पालिका आणि व्हीजेटीआय अहवालाची या प्रकरणात पालिका आणि व्हीजेटीआय काॅलेजचा आढावा घेऊनच पुढील कारवाईची दिशा ठरेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणात सहायक पोलिस अधिकारी शहाजी निकम याची चौकशी बुधवारी पूर्ण झाली असून आतापर्यंत ७ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.