Join us

भाच्याने करून टाकली मामाचीच कोंडी; काँग्रेसची अडचण; फडणवीसांची राजकीय खेळी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 10:22 AM

वडील-मुलात सामना नको म्हणून सुधीर यांनी अर्ज न भरण्याची भूमिका घेतली आणि सत्यजित यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.

- दीपक भातुसेमुंबई : महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कोंडी केली असून आपले मामा आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची अडचण केली आहे. सत्यजित यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरताना मामा बाळासाहेब, वडील सुधीर आणि काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. यामागे फडणवीस यांची खेळी असल्याची चर्चा आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुधीर तांबे काँग्रेसचा एबी फॉर्म घेऊन अर्ज भरायला आले होते. त्याचवेळी सत्यजित तांबे अपक्ष म्हणून अर्ज भरायला आले. भाजपकडून एबी फॉर्म घेऊन भाजपचे संघटनमंत्री आणि सरचिटणीस तिथे पोहचले होते. सुधीर तांबेंनी काँग्रेसचा अर्ज भरला असता तर सत्यजित हे भाजपचा एबी फॉर्म घेऊन अर्ज भरण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. सत्यजित अर्ज भरण्यावर ठाम असल्याने वडील सुधीर यांचीही अडचण झाली.

वडील-मुलात सामना नको म्हणून सुधीर यांनी अर्ज न भरण्याची भूमिका घेतली आणि सत्यजित यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. भाजपने आपला उमेदवारच दिलेला नाही. त्यामुळे भाजपकडून सत्यजित यांना पाठिंबा दिला जाण्याची चर्चा असून फडणवीस यांच्या या खेळीमुळे काँग्रेसची  अडचण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अशी झाली खेळी...

काँग्रेसने या मतदारसंघासाठी सुधीर तांबे यांची उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तास आधी जाहीर केली होती. सत्यजित यांना निवडणूक लढवायची होती. त्यांना उमेदवारी द्यायला काँग्रेसही तयार होती. मात्र, तांबे यांना भाजपनेही उमेदवारीची ऑफर दिली होती. वडील निवडणुकीत उतरणार असल्याने आपण भाजपकडून उमेदवारी कशी भरायची हा प्रश्न सत्यजित यांच्यासमोर होता. त्यामुळेच काँग्रेसमध्येच असल्याचे दाखवण्यासाठी त्यांनी अपक्ष अर्ज भरला आणि भाजपचाही पाठिंबा मिळवला.

टॅग्स :सत्यजित तांबेदेवेंद्र फडणवीसभाजपाकाँग्रेस