Join us

दीपावली निमित्त आकर्षक विद्युत रोषणाईने गोरेगावचे रस्ते झाले प्रकाशमय

By मनोहर कुंभेजकर | Published: October 21, 2022 12:58 PM

पी दक्षिण विभागाने केला रस्त्यांवर झगमगाट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई-यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा अभियान राबवताना संपूर्ण मुंबई महानगर तिरंगा विद्युत रोशणाईने झळाळून निघाले होते. त्याला मिळालेला मुंबईकरांचा प्रतिसाद लक्षात घेता, दीपावली सणाच्या निमित्ताने दि २२ ते २९ ऑक्टोबर  या एका आठवड्याच्या कालावधीसाठी मुंबईतील महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, वाहतूक बेटं इत्यादींवर विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. 

दीपावली निमित्त आकर्षक रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने गोरेगावचे रस्ते झाले प्रकाशमय झाले असून पी दक्षिण विभागाने केला रस्त्यांवर झगमगाट करून गोरेगावच्या सौदर्यात भर टाकली आहे.

मनपा आयुक्तानी दिलेल्या आदेशानुसार, या वर्षी दिवाळीत रस्त्यावर रोषणाई करण्याचे ठरले,आणि त्यानुसार गोरेगावकरांची दीपावली प्रकाशमय करण्यासाठी परिमंडळ चारचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन फक्त दोनच दिवसात  पी दक्षिण विभागात स्वामी विवेकानंद रस्ता, पश्चिम दृतगती मार्ग तसेच लिंक रोड आणि काही वाहतूक बेटे अतिरिक्त रोषणाई करून गोरेगावकरांची दीपावली प्रकाशमयकरून या रस्त्यांवर झगमगाट केला आहे.

पी दक्षिण विभागात सौंदर्यात्मक रुप बहाल करणारा आणि सकारात्मक भावना निर्माण करणारा असा सौंदर्यीकरण प्रकल्प आहे. सदर कामासाठी आयुक्तानी विशेष निधी अत्यंत तातडीने उपलब्ध करून दिला होता आणि हे काम अत्यंत तातडीने करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार त्याच तातडीने पी दक्षिण विभागात हे काम पूर्ण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये एन दीपावलीत उत्साहापूर्ण वातावरण आहे.

प्रथमच संपूर्ण गोरेगावातील स्वामी विवेकानंद रस्ता, लिंक रोड, तसेच पश्चिम दृतगती मार्गांवर, विलोभनीय रोषणाई करण्यात आल्याने नागरिकांमध्ये मात्र मनपा बद्दल प्रसन्नशीय उदगार काढले जात आहेत. तसेच स्थानिक दुकानदार देखील खूष असून, मुंबई महानगरपालिका प्रशासन तसेच सहाय्यक आयुक्त  राजेश अक्रे यांना विशेष धन्यवाद देऊन त्यांचे कौतुक करत आहेत.