Join us

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त बंदिवानांनी गिरवले राष्ट्रभक्तीचे धडे 

By संजय घावरे | Published: May 28, 2024 7:44 PM

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने ठाणे मध्यवर्ती कारागृहात नुकतीच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानमधील कारागृहात बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्तीपर विचार रूजवून अनेक देशभक्त घडवले. आज ते हयात नसले तरी त्यांच्या विचारांतून आजच्या बंदिवानांमध्ये देशभक्ती रुजवण्याचे कार्य रामचंद्र प्रतिष्ठान ही मुंबई येथील संस्था गेली सात वर्षे सलगपणे करत असून यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनापासून सुरू झालेला हा उपक्रम त्यांच्या जयंतीपर्यंत महाराष्ट्रातील ठाणे, नाशिक रोड, संभाजीनगर, धुळे, जळगाव, सोलापूर, अलिबाग, नांदेड आदी अनेक मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहांमध्ये राबविण्यात आला. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने ठाणे मध्यवर्ती कारागृहात नुकतीच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या उपक्रमात बऱ्याच महिला व पुरुष बंदिवान सहभागी झाले होते. त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून व्यक्त केलेले त्यांचे विचार हे त्यांच्यातील राष्ट्रभक्तीच्या विचारांकडे भारावून आणि परावर्तित झालेल्या व्यक्तिमत्वाचा प्रत्यय देणारे आहेत. कारागृहातून सुटल्यानंतर समाजात वावरताना आपल्या स्तरावर शक्य तितकी राष्ट्रसेवा करण्याचाही त्यांचा निर्धार स्तुत्य असल्याचे संस्थेच्या संचालिका नयना शिंदे यांनी म्हटले आहे.

संस्थेच्या या कार्याची दखल जळगाव येथील केशवस्मृती सेवा समूहाने घेतली असून त्यांना प्रतिष्ठेचा डॉ. आचार्य अविनाशी पुरस्कार छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहातील शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. या पुढेही अन्य कारागृहांमध्ये या स्पर्धा होणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.