मुंबई –यंदा तब्बल दोन वर्षांनंतर कोविड निर्बंधमुक्त वातावरणात हा उत्सव साजरा होत असल्याने गणेश भक्तांचा तसेच विविध राजकीय पक्षांमध्ये उत्साह आहे.आगामी काळात होणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुका लक्षात घेता सत्ताधारी व विरोधी अश्या विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आपले राजकीय ब्रँडिंग करण्याचा विविध मार्गांनी कसोशीने प्रयत्न केल्याचे मुंबईतील चित्र आहे.
राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा वर्गणीच्या स्वरूपात आर्थिक मदत केली आहे. तर अनेक मंडळांना वर्गणी बरोबरच लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कटआऊटचे गेट आणि बॅनर देखिल दिले आहेत.तर अनेक मोक्याच्या जागी दर्शनीय भागात त्यांचे मोठे गेट्स आणि बॅनर देखिल लागले आहेत.तर अनेक लोकप्रतिनिधींनी खास आपल्या भागातून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एसटी बसेस तसेच लक्झरी बसेस सुद्धा सोडल्या आहेत.तर अनेकांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सुमारे 21 वस्तूंचा समावेश असलेल्या पूजेच्या साहित्यांच्या बॉक्स राजकीय लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांनी गणेश भक्तांच्या घरी पोहचवला आहे.
मुंबईतील प्रत्येक वॉर्ड मध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांचे बॅनर नजरेस पडत आहे.तर आपल्या भागातील सार्वजनिक तसेच घरगुती गणपतींच्या दर्शनाला काल पासून भेटी द्यायला लोकप्रतिनिधींनी सुरवात केली आहे.निमित्त गणेशोत्सवाचे मात्र मोर्चे बांधणी पालिका निवडणुकीची असे काहीसे मुंबईतील चित्र आहे.