Join us

महापरिनिर्वाण दिनानिमित्त गरज असेल तिथे अधिक प्रमाणात सेवा-सुविधांचे नियोजन करा, महापालिका मुख्यालयात समन्वय बैठक

By सचिन लुंगसे | Published: October 07, 2022 7:34 PM

महापरिनिर्वाण दिनानिमित्त गरज असेल तिथे अधिक प्रमाणात सेवा-सुविधांचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

मुंबई : सन २०२० व २०२१ या सलग २ वर्षीच्या महापरिनिर्वाण दिनी कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर संबंधित नियमांचे पालन करुन अनुयायांनी आपले श्रद्धासुमन अर्पित केले होते. सदर दोन्ही वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या विनंतीला व आवाहनांना अनुयायांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य केले होते. या सहकार्यास्तव अनुयायांचे व सर्व संबंधितांचे आभार मानत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व संबंधित यंत्रणांना यंदाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तची व्यवस्था ही कोविड पूर्व परिस्थितीनुरुप अर्थात सन २०१९ च्या धर्तीवर करण्याचे निर्देश दिले. ते आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापरिनिर्वाण दिन समन्वय बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी बोलत होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिनांक ६ डिसेंबर २०२२ च्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधांची माहिती उपस्थितांना संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये प्रामुख्याने नियंत्रण कक्ष, सुशोभिकरण, टेहाळणी मनोरा, निर्देशक फुगा, छायाचित्रांचे प्रदर्शन, रांगेतील व्यवस्था, शासकीय मानवंदना, हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी, माहिती पुस्तिका, स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, निवासी मंडप, विद्युत व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, इत्यादी बाबींची माहिती उपस्थितांना देण्यात आली. 

वरील अनुषंगाने उपस्थितांशी संवाद साधताना महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सन २०१९ मध्ये दादर येथील चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात पुरविण्यात आलेल्या व्यवस्थेच्या व सोयी-सुविधांच्या धर्तीवर यंदाचे नियोजन करण्यात येत आहे. तथापि, याबाबत ज्या ठिकाणी गरज असेल, त्या ठिकाणी अधिक प्रमाणात सेवा-सुविधांचे नियोजन करण्याचेही निर्देश त्यांनी आजच्या बैठकी दरम्यान दिले. तसेच सर्व यंत्रणांनी आपापसात सुयोग्‍य समन्‍वय साधून कार्यवाही करण्याचे आणि अधिकाधिक प्रभावीपणे सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेशही आयुक्‍तांनी आज दिले.

 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका