Join us  

महापरिनिर्वाण दिनानिमित्त घरातूनही अभिवादन करता येणार; थेट प्रक्षेपणाची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 7:21 AM

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येतात.

मुंबई :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लाखोंच्या संख्येने राज्यभरातून अनुयायी चैत्यभूमीत दाखल झाले आहेत. या अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून पालिकेने सोयीसुविधा पुरविल्या आहेत. अनुयायांना कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी पालिकेचे अधिकारी तैनात राहणार आहेत, याशिवाय ऑनलाइन थेट प्रक्षेपणाची सुविधा करण्यात आली असून, अनुयायांना आपल्या घरी राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करता येणार आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यांच्या सोईसुविधेसाठी पालिकेची यंत्रणा सज्ज आहे. महापालिका प्रशासनाने दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमीपर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त केला आहे.  याशिवाय बेस्ट उपक्रमाच्या वतीने चैत्यभूमीकडे जाण्यासाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. बेस्ट प्रवर्तन नियंत्रण व मार्गदर्शनासाठी वाहतूक अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, अखंडित वीजपुरवठ्यासाठी जनरेटरर्स एरियल लिफ्टस व  विशेष पथक तैनात करण्यात आले आहेत. दिवे व सर्च लाइट लावण्यात आले आहेत, याशिवाय मुंबई दर्शनासाठी चैत्यभूमीपासून १५० रुपयांत विशेष बसेस सोडण्यात आल्या आहेत. ७ डिसेंबरपर्यंत चैत्यभूमी फेरी सुरू राहणार आहे.

चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपणप्रत्यक्ष चैत्यभूमीवर येऊ न शकणाऱ्या अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर रोजी अभिवादन करता यावे, यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या समाजमाध्यमावरुन करण्यात येणार आहे. सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून करण्यात येणार आहे.

बेस्टकडूनही व्यवस्था मुंबई परिसरातून तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी दादर स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान- चैत्यभूमी येथे जाण्याकरिता चैत्यभूमी फेरी या नावाने अतिरिक्त बसफेऱ्या चालवल्या जाणार आहेत.  एरियल लिफ्ट व वॉकी टॉकीने सुसज्ज असलेली पक्षके तैनात असून, वीज पुरवठ्यासाठी राखीव पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

तात्पुरता निवारा आणि शामियाना दादर येथे येणाऱ्या अनुयायांना काही काळ विश्रांती घेता यावी, यासाठी शिवाजी पार्क येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून सदर परिसरातील महानगरपालिकेच्या ६ शाळांत सोय करण्यात आली आहे.  महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक सर्व नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर