महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 08:35 AM2024-05-01T08:35:14+5:302024-05-01T08:36:23+5:30
loksabha Election - महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. त्यावेळी ठाकरेंनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.
मुंबई - Uddhav Thackeray ( Marathi News ) ज्या लोकांनी आपलं बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. आमचं कर्तव्य आहे त्यांना अभिवादन केले पाहिजे. ज्यांनी रक्त सांडून आम्हाला मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. हा महाराष्ट्र आम्ही कधी कुणाचा गुलाम होऊ देणार नाही. जे महाराष्ट्र लुटतायेत, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवतायेत त्यांना ते करू देणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि जिद्द काय असते ती येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही लुटारुंना दाखवून देऊ असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचा महाराष्ट्र हा कणखर आणि स्वाभिमानी बाण्याचा आहे. त्या स्वाभिमानाला कुणी नखं लावलं तर आम्ही ‘मशाल’ होऊन लढू, ह्या विचाराची साक्ष देणारा ‘हुतात्मा चौक’.हे स्मारक म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रवर नजर रोखून बसलेल्या परकीयांना रोखण्यासाठी बळ देणारं एक शक्तीपीठ आहे असं त्यांनी सांगितले. महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाच्या नेत्यांनी हुतात्मा चौक येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील स्मारकाला अभिवादन केले.
बारामतीच्या सभेतूनही ठाकरेंचा हल्लाबोल
बिनआत्म्याची जी भटकती शरीर फिरताहेत त्यांना जय भवानी, जय शिवाजीचं महत्त्व कळणार नाही. भाजपाने देशाला ना विचार दिला, ना नेता दिला, ना स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलं. महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जातेय ते हुतात्मे बघताहेत, आम्ही कोणासाठी बलिदान दिलं? देशाच्या लुटारुंना महाराष्ट्र साथ देईल का? तुम्हाला महाराष्ट्र लुटणारा हवा की, महाराष्ट्र जपणारा हवा असा सवाल उद्धव ठाकरेंनी करत भाजपावर हल्लाबोल केला. बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत ते बोलत होते.
दरम्यान, हुतात्मा स्मारकावर फक्त अभिवादन करून चालणार नाही तर आजच्या या सभेत एक शपथ घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जातेय, महाराष्ट्रात हुकुमशाह फिरत आहे. काहीही झाले तरी हा महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात जावू देणार नाही अशी शपथ मी घेतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर टीका केली.