शिळा सणानिमित्त मढ समुद्र किनाऱ्यावर रंगणार कुस्त्यांचे जंगी सामने
By मनोहर कुंभेजकर | Published: September 5, 2022 08:38 PM2022-09-05T20:38:28+5:302022-09-05T20:39:55+5:30
मुंबई-सध्याच्या काँक्रीटीकरणाच्या जगतात ,मालाड पश्चिम मढ कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे.
मुंबई-सध्याच्या काँक्रीटीकरणाच्या जगतात,मालाड पश्चिम मढ कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे. शिळा सणाची मढच्या कोळीवाड्यातील नागरिकांना प्रतीक्षा असते. मढ कोळीवाड्यात १९५४ पासून गौरी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शिळा सण साजरी गेल्या ६८ वर्षांची परंपरा आहे. गौरी गणपतीच्या काळात मासेमारीतून येथील कोळी समाजाला थोडी विश्रांती मिळते. येथील सर्व गावकरी एकत्र येऊन शिळा सण साजरा करतात अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी दिली.
सालाबाद नुसार उद्या मंगळवार संध्याकाळी ६.०० वाजता नवजवान तरूण मंडळाच्या वतीने गौरी-गणपती (शिळा सणा) निमित्त मढ कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यावर कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित केले आहेत. यावेळी विजेत्या पेहलवानांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.
या सणासाठी खास खरेदी केलेल्या रंगबिरंगी साड्या, ब्रास बँड आणि बँजो पथकाच्या तालावर कोळी महिलांचे पारंपरिक नृत्य, कुस्त्यांचा फड, यावेळी हजेरी लावणारे दूरदूरचे मल्ल असा जल्लोष येथे खास बघायला मिळतो अशी माहिती नवजवान तरूण मंडळाचे अध्यक्ष उपेश कोळी यांनी लोकमतला दिली. शिळा सण साजरा करण्यासाठी संध्याकाळी येथील वेगवेगळ्या मंडळांच्या महिला रंगबिरंगी साड्या परिधान करून ब्रास बँडच्या आणि बेंजो पथकाच्या तालावर नाचत,वाजत, गाजत समुद्रकिनारी एकत्र येतात. येथील बँड पथक व बेंजोच्या तालावर कोळी महिला नृत्याचा फेर धरतात. सूर्य अस्ताला गेल्यावर मढमध्ये कुस्त्यांचे फड रंगतात. आखाड्याभोवती बेभान होऊन कोळी महिला नाचतात.त्यानंतर रात्री उशिरा पर्यंत येथे शिळा सणाचा हा उत्सव सुरू असतो अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी दिली.
यावेळी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, माजी मंत्री व स्थानिक आमदार असलम शेख, कोळी महासंघाचे अध्यक्ष, आमदार रमेश पाटील,माजी नगरसेविका संगीता संजय सुतार, मच्छिमार नेते किरण कोळी, श्री हरबादेवी (ग्रामदेवी) मंदिर ट्रस्ट अध्यक्ष महेश पाटील, गावातील मच्छिमार संस्थांचे अध्यक्ष राजेन कोळी, चंद्रकांत नगी, संतोष कोळी, कृष्णा कोळी, भाटी मच्छिमार संस्था अध्यक्ष राजीव कोळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.